BMC
BMC Tendernama
टेंडर न्यूज

मुंबईत 30 टक्केच नालेसफाई, ठेकेदार ठाकरेंच्या जवळचे; भाजपचा आरोप

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील नालेसफाई आतापर्यंत केवळ ३० टक्के इतकीच झाली असून ८० टक्के नालेसफाई झाल्याचा मुंबई महापालिका प्रशासनाचा दावा खोटा असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच नालेसफाईच्या २८० कोटींच्या कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार उद्धव ठाकरेंच्याच जवळचे आहेत. या कंत्राटदारांनी गैरव्यवहार केला आहे. गाळाच्या मोजमापात हातचलाखी करीत आहेत, असा आरोपही भाजपने केला आहे.

पश्चिम उपनगरातील नाल्यांची मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी शनिवारी पाहणी केली. त्यांनी साऊथ एव्हेन्यू नगर - गझदर बांध नाला, पवन हंस नाला व एस.एन.डी.टी. नाला, गजधर बांध पंपिंग स्टेशन, मिलिनेयम क्लब जवळ इर्ला नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला आदी नाल्यांची त्यांनी पाहणी केली. या पाहणी दरम्यान महापालिका प्रशासन करीत असलेला नालेसफाईचा 80 टक्के दावा खोटा असलल्याची टीका त्यांनी केली. पावसाळा जवळ आला असताना महापालिका प्रशासनाकडून नालेसफाई झाल्याचे सांगत जे आकडे दिले जात आहेत ते केवळ रतन खत्रीचे आकडे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

राहुल नगर नाल्यात सफाईचे कामच झालेले नाही. गझदरबंध नाल्याचे काम काल सुरु केले आहे. कालच जेसीबी लावत तिथे गाळाचा अंदाज घेतला गेला. तर गझदरबंध पंपिंग स्टेशन समोर गाळाचे ढीग लागले आहेत. एसएनडीटी नाल्याचे काम ही नुकतेच सुरु झाले असून बेस्ट कॉलनी नाल्यात वनस्पती उगवलेल्या दिसतायत. प्रत्यक्षात केवळ २५ ते ३० टक्के काम झाले असताना महानगरपालिका करत असलेले ७० ते ८० टक्के सफाईचे दावे खोटे असल्याचे दिसून आल्याचे शेलार यांनी सांगितले.

महापालिकेचे सर्व दावे कंत्राटदारांच्या जीवावर होत आहेत. कामात निष्काळजीपणा सुरु आहे. नालेसफाईच्या २८० कोटींपेक्षा जास्तच्या कामासाठी जे कंत्राटदार नियुक्त केले आहेत ते उद्धव ठाकरेंच्याच जवळचे, त्यांच्याच सत्ता काळातील आहेत. त्यांच्यावर आमचा, मुंबईकरांचा भरोसा नाही. कंत्राटदारांनी गैरव्यवहार केला आहे. गाळाच्या मोजमापात हातचलाखी करीत आहेत. ही बाब आजच्या पाहणीत दिसून आल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे हे कंत्राटदारांची वकिली करीत असल्याची टिका त्यांनी केली आहे. मुंबईत पाणी भरणार नाही याची खात्री देणार काय असा सवाल त्यांनी ठाकरे यांना केला आहे. या दौऱ्यात आमदार अमित साटम, भारती लवेकर, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा, उज्वला मोडक, अभिजित सामंत, हेतल गाला, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, योगीराज दाभाडकर आदींसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.