<div class="paragraphs"><p>bollards</p></div>

bollards

 

tendernama

टेंडर न्यूज

टेंडरनामाकडून एक्स्पोज; सायकल ट्रॅकच्या नावाखाली कोट्यवधींचा चुना

संजय चिंचोले

औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) (MSCDCL) सायकल ट्रॅकच्या (Cycle Track) नावाखाली कोट्यवधींचा चुना लावल्याचे टेंडरनामाच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. सायकल ट्रॅकसाठी एक बोलार्ड्स (रबरी खांब) तब्बल ७९८ रूपयात खरेदी करून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे.

औरंगाबाद महापालिकेअंतर्गत एएससीडीसीएलने सायकल ट्रॅकसाठी बाजारात जीएसटी, फिटींग आणि वाहतूकीसह १७५ रुपयांत मिळणारे बोलार्ड्स चक्क ७९८ रूपयात खरेदी केले आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या जनसंपर्क अधिकारी अर्पिता शरद यांनी गेल्या आठ दिवसांपासून माहिती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर औरंगाबादसह पुणे, मुंबई, नाशिक, दिल्ली, चेन्नईतील नामांकीत कंपन्यांचे कोटेशन मिळवले. त्या माहितीतून खरेदीचे दर अ‌व्वाच्या सव्वा असल्याचे पुढे आले आहे.

एएससीडीसीएलअंतर्गत क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन दरम्यान पहिला सायकल ट्रॅक तयार झाल्यानंतर अन्य भागांमध्ये सायकल ट्रॅक निर्मितीसाठी देखील पुढाकार घेण्यात आला. सायकलिंगसाठी शहर सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण व्हावे या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीझन मिशनने सायकल फोर चेंज चॅलेंज सुरू केले.

सीईओंचा पुढाकार

देशव्यापी स्पर्धात्मक आव्हानाचा एक भाग म्हणून मनपा प्रशासक, आयुक्त तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तीक कुमार पांडेय यांच्या नेतृत्वात एएससीडीसीएलने औरंगाबादेत क्रांती चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत पहिला सायकल ट्रॅक तयार केला. याशिवाय सिडको एन-१, सिडको जालनारोड ते हर्सूल टी पॉईंट, हर्सूल टी पॉइंट ते दिल्लीगेट, दिल्ली गेट ते बिबी का मकबरा, हॉटेल ताज ते सेव्हन हिल, रेल्वे स्टेशन ते क्रांती चौक, हाॅटेल रामगिरी ते जीएसटी कार्यालय, कॅनाॅट प्लेस आदी परिसरातील पायलट प्रोजक्ट हाती घेतला.

टेंडरनामा प्रतिनिधीने शहरातील विविध भागात सायकल ट्रॅकसाठी रोवण्यात आलेल्या बाॅलार्ड्सची माहिती काढली असता जेम पोर्टलवर टेंडर प्रक्रियेतून स्वान इलेक्ट्रो मॅक कंपनीकडून जीएसटी करासह फिटींग आणि वाहतूक खर्चासह प्रति युनिट ७९८ रूपयात टप्प्याटप्प्याने ३० हजार बोलार्ड्स खरेदी केल्याचे सांगण्यात आले. यासाठी तब्बल २३ कोटी ९ लाख ४० हजार रूपये कंपनीला अदा केल्याचीही माहिती समोर आली. यात वर्षभरात विविध भागात सहा हजार बोलार्ड्स रोवत ४ कोटी ७ लाख ८८ हजार रूपये खर्चाचा आकडा हाती आला.

या प्रश्नांचे उत्तर निरूत्तर

- यावर एएससीडीसीएलच्या जनसंपर्क अधिकारी अर्पिता शरद यांना सायकल ट्रॅक टेंडर प्रक्रियेत किती टेंडरधारकांनी भाग घेतला होता?

- निविदा कधी काढण्यात आल्या व कधी खुल्या करण्यात आल्या होत्या ?

- एका बोलार्ड्सची किंमत ७९८ कशी ठरवण्यात आली. यासाठी कोणत्या कंपनींकडून कोटेशन मागविण्यात आले होते काय ?

- स्वान इलेक्ट्रोमॅकला कधी वर्क ऑर्डर देण्यात आली. त्या कंपनीचा पत्ता आणि संपर्क क्रमांक मिळेल काय ?

अशी ही लपवाछपवी

या प्रश्नांचे उत्तर तर अर्पिता शरद यांनी दिलेच नाही. या उलट कंत्राटदाराचे नंबर आणि पत्ता देणे आमच्या धोरणात बसत नसल्याचे सांगत त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

औरंगाबादसह पुणे, मुंबई, नाशिक, दिल्ली, चेन्नईतील नामांकीत कंपन्यांना पाठवले. विशेष म्हणजे सदर कंपन्यांनी याच बोलार्ड्चे कोटेशन पाठवले. त्यात एएससीडीसीएलने खरेदी केलेल्या बोलार्ड्चे दर व बाजारातील दरात मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे बोलार्ड्स खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे सबळ पुरावे टेंडरनामाच्या हाती आले आहेत.

औरंगाबादेत १७५ रूपये

एएससीडीसीएलने १ फुटाचे पाॅली युरेथान प्रकारच्या रबराचे हे बोलार्ड्स प्रतिनग ७९८ रूपयांप्रमाणे खर्च करत २३ कोटी ९ लाख ४० हजार रूपये कंपनीला अदा केले. प्रत्यक्षात त्याची औरंगाबादच्या बाजारात सर्व करासह वाहतूक आणि फिटींगसह १७५ रूपये किंमत आहे. मात्र पुणे, नाशिक आणि मुंबईच्या बाजारात हीच किंमत ४८२ ,दिल्ली, चेन्नईच्या बाजारात ४५६ ते ४७६ रूपयाच्या दरम्यान आहे. एकूणच या प्रकल्पात कोट्यवधींचा अपहार एएससीडीसीएलच्या अधिकारी आणि कंत्राटदाराने संगनमताने केल्याचे उघड होत आहे.

स्वान इलेक्ट्रो मॅकने ना कोटोशन दिले ना रेट

यावर एएससीडीसीएलने ज्या कंपनीकडून बोलार्ड्स खरेदी केले होते, त्या कंपनीचा देखील टेंडरनामा प्रतिनिधीने शोध लावला. सदर स्वान इलेक्ट्रो मॅकचे संचालक अजय बुर्हांडे (नाशिक) यांच्याशी सलग दोन दिवस कोटोशनची मागणी केली. त्यात एएससीडीसीएलने खरेदी केलेलेच बोलार्ड्स हवे आहेत अशी मागणी देखील केली. मात्र अद्याप बुर्हांडे यांनी कोटेशन न दिल्याने या प्रकरणात अधिक संशय बळावत आहे.

आमदार संजय सिरसाट भडकले

या प्रकरणी आमदार संजय सिरसाट यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला. आधीच शहरातील रस्ते अरूंद आहेत. त्यात अशा पद्धतीने बोलार्ड्स लावून उलट वाहतूकीचा चक्काजाम होत आहे . स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल ट्रॅकला माझा सुरूवातीपासूनच विरोध आहे. आता बोलार्ड्स खरेदीचे ऑडिट करायला भाग पाडणार व दोषींवर कारवाई करायला लावणार असे ते म्हणाले.