Mumbai Goa Highway Potholes Tendernama
टेंडर न्यूज

मुंबई - गोवा हायवेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर! काय दिले आदेश?

Ajit Pawar On Mumbai Goa Highway: खड्ड्यांची तक्रार मिळताच होणार कार्यवाही; इंदापूर - माणगाव बायपाससाठी 21 कोटींचा निधी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Ajit Pawar On Mumbai Goa Highway): मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर तातडीने पूर्ण करावीत. महामार्गावरील इंदापूर - माणगाव नजीकच्या रस्त्यासाठी २१ कोटींचा निधी उपलब्ध करणार असून, ही कामे तातडीने पूर्ण करावीत. मुंबई-गोवा महामार्गावरील अपुरीकामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमून कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले.

मंत्रालयात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाविषयी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे सचिव डॉ. राजगोपाल देवरा यावेळी उपस्थित होते.

२७ ऑगस्टपासून कोकणातील गणेशोत्सवाला सुरूवात होत असून लाखोंच्या संख्येने कोकणवासीय आपापल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. या पार्श्‍वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी करणे व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी मांडली.

१० ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने पळस्पे फाटा, पनवेल येथे पाटपूजा करून आंदोलन सुरू केल्याची बाब खासदार सुनिल तटकरे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-गोवा महामार्गाची अपुरी राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती नेमून मुंबई-गोवा महामार्गाची चौपदीकरणाची कामे, रस्त्यातील खड्ढे भरणे, विविध ठिकाणी माहितीपूर्ण दिशादर्शक फलक लावणे, पूलांची कामे, महामार्गावर ट्रामा केअर सेंटर उभारणे, दर चाळीस किलोमीटर अंतरावर शौचालयांची व्यवस्था यासह इतर सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे.

विभागाने रस्त्यातील धोकादायक असलेले खड्डे तत्काळ भरुन घेण्यासाठी विशेष दोन अधिकारी यांची नियुक्ती करावी. नागरिकांना या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी.

म्हणाले की, गणेशोत्सव कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जातात. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने मोठी बांधकामाची कामे ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतील अशी थांबवावीत. जिथे जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे अशी ठिकाणे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग प्रशासनाने पाहणी करून तिथे वाहतूकीचे काटेकोरपणे नियोजन करावे. अवजड वाहने तसेच इतर वाहतुकीचे नियोजन करावे. घाट रस्ते तसेच वळणाच्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. वैद्यकीय सोयी सुविधा यांची देखील स्थानिक प्रशासनाने सोय करावी.

यावेळी या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस अधीक्षक वाहतूक राष्ट्रीय महामार्ग तानाजी चिखले, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गचे मुख्य अभियंता प्रशांत फेगडे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता कोकण भवन संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, रायगडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय यादवराव, बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम, प्रकाश भांगरथ यावेळी उपस्थित होते.