Aditya Thackeray
Aditya Thackeray Tendernama
टेंडर न्यूज

Aditya Thackeray : मेगा रस्ते घोटाळ्यातील पाचही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार का?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : आता तरी मुंबईतील मेगा रस्ते घोटाळ्यातील पाचही कंत्राटदारांना (Contractors) काळ्या यादीत (Black List) टाकले जाईल आणि मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावला जाईल का, अशी विचारणा युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेत प्रशासकाच्या कारकीर्दीत झालेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याला आता एक वर्ष पूर्ण झालेले आहे. याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करून घोटाळेबाजांवर कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे या घोटाळ्याला जबाबदार असलेले रस्ते विभागाचे अधिकारी आणि ज्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात हा घोटाळा झाले ते महापालिका आयुक्त - प्रशासक चौकशीला सामोरे जाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन हे सवाल उपस्थित केले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी, तुमच्या थेट निरीक्षणाखाली महापालिकेने सुरू केलेल्या 'महा'रस्ते घोटाळ्याला जवळपास एक वर्ष झाले आहे. या रस्त्यांच्या कंत्राटातील अनियमितता आम्ही सातत्याने मांडली आहे.

तुम्ही ज्या पद्धतीने ही कंत्राटे त्यांना 'भेट' दिलीत इथपासून, ते त्या कंत्राटदारांना मिळणारा अवास्तव पैसा, मुंबईकरांच्या पैशातून कंत्राटदारांना होणारा प्रचंड आर्थिक नफा आणि हे सगळे होताना प्रत्यक्षात मुंबईत काहीही कामे झालेली नाहीत इथपर्यंतची माहिती दिली. शहर विभागात कोणतीही कामे झाली नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामातील घोटाळ्यासाठी निलंबित करण्यात आलेल्या कंत्राटदाराला अद्याप अद्याप काळ्या यादीत टाकण्यात आले आहे का? केले असल्यास ती माहिती सार्वजनिक करावी आणि इतर सर्व राज्ये आणि शहरांनाही त्याबद्दल माहिती द्यावी. या कंत्राटदाराला त्याच्या गुह्यासाठी दंड भरावा लागला आहे का? दक्षिण मुंबईतील रस्त्यांची कामे कधी सुरू केली जातील? दिलेल्या कामांमधील सद्यस्थितीत किती कामे सुरू झाली आहेत? त्यांची आजची स्थिती काय आहे? कामाची सद्यस्थिती तपासता यावी यासाठी मुंबईकरांना आश्वासन दिलेले सीसीटीव्ही आणि सार्वजनिक डॅशबोर्ड मुंबई महापालिकेने बसवले आहेत का, असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे यावेळी तरी योग्यरीत्या मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासक म्हणून तुमच्या देखरेखीखाली मागच्या एका वर्षाच्या काळात महापालिकेची दयनीय अवस्था होत चाललेली पाहून मुंबईकर हैराण झाले आहेत. यामध्ये तो स्ट्रीट फर्निचर घोटाळा असो की रस्ते घोटाळा, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन घोटाळा असो की सुशोभीकरण घोटाळा. असे अजून बरेच घोटाळे आम्ही उघड करणार असल्याचेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

प्रशासकाच्या कार्यकाळात महापालिकेची कार्यक्षमता ढासळत चालली असून प्रचंड भ्रष्टाचार वाढत चालला असल्याचेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

लोकप्रतिनिधी नसताना मुंबई महानगरपालिकेत सध्या गोंधळाचे, अपारदर्शक पद्धर्तीचे, भ्रष्टाचाराचे आणि जुलमी राजवटीचे थैमान सुरू आहे. मी पुन्हा एकदा फक्त आशाच करू शकतो की, आजवर जसा प्रतिसाद मिळाला (किंवा मिळालाच नाही) तसे होणार नाही आणि या वेळेस कृती होईल. रस्ते मेगा घोटाळ्यातील पाचही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल आणि मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावला जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.