Suresh Jain Gulabrao Deokar
Suresh Jain Gulabrao Deokar 
स्कॅम स्कॅनर

'घरकुला'त अडकलेले शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते

टेंडरनामा ब्युरो

45 कोटींच्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह तत्कालीन नगरसेवक आदींसह 48 संशयित आरोपींना धुळे जिल्हा कोर्टाने दोषी ठरवले. जैन यांना 7 वर्षं कारावास तर देवकर यांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

'घरकुल योजना' ही जळगाव महापालिकेची झोपडपट्टी निर्मूलन करण्यासाठी योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्याचा प्रस्ताव होता. जळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाने ही योजना राबवण्याचे ठरवले होते. ह्या योजनेत जळगाव शहरातील हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा ह्या वसाहतींचा समावेश होता.

11 हजार घरकुले बांधण्यासाठी एकूण 110 कोटी रुपये काढण्यात आले. घरकुले बांधण्याच्या कामास 1999 मध्ये सुरुवात झाली होती. 2001 मध्ये ह्या कामात गोंधळ असल्याचे समोर आले. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार उघडकीला आले.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या ही बाब लक्षात आली. घोटाळ्याची गंभीरता लक्षात घेत 3 फेब्रुवारी 2006 रोजी जळगाव शहर पोलिस ठाण्यात घरकुल योजनेत 29 कोटी 59 लाख नऊ हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार देण्यात आली. चौकशी सुरू असताना घोटाळ्याची व्याप्ती वाढत 45 कोटीच्या अपहार झाल्याचे निदर्शनास आले.

ह्या घोटाळ्यात संशयित म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री सुरेश जैन, राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह खान्देश बिल्डरचे जगन्नाथ वाणी, संचालक राजा मयूर, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी, आर्किटेक्ट, पालिकेचे विधी सल्लागार तसेच अधिकारी अशा एकूण 93 जणांविरुद्ध तक्रार देण्यात आली होती. न्यायमूर्ती पी. बी. सावंत आयोग, सुधाकर जोशी आयोग, सोनी आयोग या तीन आयोगांमार्फत जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाची चौकशी झाली.

याप्रकरणी सुरेश जैन यांना 11 मार्च 2012 ला अटक झाली होती. या प्रकरणात साडेचार वर्षे कारागृहात असलेले सुरेश जैन यांनी शिक्षेतला बराच काळ आजारपणाच्या कारणासाठी विविध खासगी व सरकारी रुग्णालयात काढला होता. नंतर त्यांची अंतरिम जामिनावर सुटका झाली. राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर हे देखील तीन वर्ष कारागृहात होते. सध्या जामिनावर आहेत. 2014 मध्ये सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांनी विधानसभा निवडणूक कारागृहातून लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच गुलाबराव देवकर यांचा 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.