बॅ. अंतुलेंच्या कारकीर्दीला सिमेंट घोटाळ्याचे ग्रहण

A R Antulay
A R Antulay

महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री बॅलिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात ८०च्या दशकात घडलेला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणून सिमेंट घोटाळ्याकडे पाहिले जाते. ज्यामध्ये थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप झाले होते आणि या घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयाने अंतुले यांना दोषी ठरवले होते. त्यामुळे त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

सिमेंट टंचाई असताना वाढीव सिमेंटसाठी प्रती गोणीमागे इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी घेतलेल्या देणग्या अंतुले यांना महागात पडल्या आणि पदाचा वापर करीत फायदा उकळल्याचा (क्विड प्रो-क्यो) ठपका न्या. लेंटिन यांनी अंतुले यांच्यावर ठेवला होता. १७ वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अंतुले यांची निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांच्यावरील घोटाळ्याचा डाग शेवटपर्यंत कायम राहिला.

A R Antulay
टेंडर घोटाळा 100 कोटींचा; शिक्षा दीड हजारांची

महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री असलेल्या बॅ. अंतुले यांच्या मुख्यमंत्रिपदाची एकूण कारकीर्द वादळी होती. इंदिरा गांधींचे अत्यंत विश्वासू असलेल्या अंतुले यांनी आणीबाणीनंतरच्या पडत्या काळात इंदिरा गांधींना खंबीरपणे साथ दिली. इंदिरा गांधींचा वाईट काळ सरल्यावर मुख्यमंत्रिपदाच्या रुपाने अंतुले यांना निष्ठेचे फळ मिळाले. इंदिरा गांधी यांनी शरद पवारांचे पुलोद सरकार पाडल्यानंतर नव्याने आलेल्या सरकारची धुरा अंतुले यांच्याकडे दिली. स्वभावाने आक्रमक असलेल्या अंतुले यांनी मुख्यमंत्रिपदी येताच धडाक्याने निर्णय घ्यायला सुरुवात केली.

A R Antulay
टेंडर मिळणे म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी!

अंतुले यांच्या कामाचा धडाका सुरु असतानाच अचानक सिमेंट घोटाळ्याचे शुक्लकाष्ट त्यांच्या मागे लागले. कलाकार, विद्यार्थी यांच्या मदतीकरिता अंतुले यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानची स्थापना केली होती. अंतुले मुख्यमंत्रिपदी असताना सिमेंट टंचाई निर्माण झाली होती. या काळात बिल्डरांना सिमेंट पुरविण्याच्या बदल्यात इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानला देणग्या मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारात वाढीव सिमेंट तेव्हा उपलब्ध करुन देण्यात आले होते. सिमेंट पोत्याच्या बदल्यात देणग्या वसूल करण्याच्या अंतुले यांच्या निर्णयाच्या विरोधात पा. बा. सामंत आणि रामदास नायक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याद्वारे अंतुले यांनी ३० कोटी रुपयांचा निधी जमा केल्याचा आरोप झाला होता.

A R Antulay
गोष्ट तेलगी घोटाळ्याची...

प्रतिष्ठानसाठी देणग्या या धनादेशाच्या माध्यमातूनच घेण्यात आल्या होत्या, असा दावा अंतुले यांनी केला होता. तर अंतुले यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी देणग्यांसाठी रोख रक्कमही जमा केल्याचा आरोप केला होता. इंदिरा गांधी यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री बेकायदेशीरपणे निधी जमा करीत असल्याचा आरोप झाला होता. या देणग्यांशी इंदिरा गांधी यांचेही नाव जोडले गेले. मुख्यमंत्रिपदी अंतुले यांची निवड करण्यास काँग्रेसमध्ये विरोध झाला होता. सारे प्रस्थापित नेते अंतुले यांच्या विरोधात होते. संधी येताच या नेत्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या. आपले नाव जोडले गेल्याने इंदिरा गांधी संतप्त झाल्या आणि अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला.

A R Antulay
निविदा विना उभारले कोविड केंद्र

पदाचा गैरवापर करीत फायदा उकळल्याचा ठपका उच्च न्यायालयाचे न्या. लेंटिन यांनी अंतुले यांच्यावर ठेवला होता. या निर्णयाच्या विरोधात अंतुले यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. १७ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर अंतुले यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पण सिमेंट घोटाळ्यामुळे एकेकाळी काँग्रेसच्या राजकारणात वजनदार नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंतुले यांची राजकीय कारकीर्द जवळपास संपुष्टातच आली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com