B. Ramalinga Raju
B. Ramalinga Raju Tendernama
स्कॅम स्कॅनर

शेअर बाजाराला 8 वर्षांत असा लागला हजारो कोटींचा चुना!

Ashok Jawale

सत्यम कॉम्प्युटरचा उदय आणि अस्त!

मागील शतकाच्या अखेरीच म्हणजेच १९९० नंतर सर्वाधिक चर्चा होती ती Y2K समस्येची. शतक बदलत असल्याने कॉम्युटरच्या प्रोग्रामिंगमध्येही मोठ्या प्रमाणात बदलांची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे Y2K समस्येच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने एच-१ व्हिसाच्या नियमांमध्ये शिथीलता आणली गेली. त्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला असेल तर तो भारतीय प्रोग्रामर्सना. अमेरिकेतील मोठ्या मागणीमुळे हजारो भारतीय प्रोग्रामर्सना तिकडे नोकऱ्या मिळाल्या. त्या पाठोपाठ भारतीय आयटी कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणात कामे मिळाल्याने भारतात आयटी बूम आले होते. या संधीचा पहिला फायदा घेणाऱ्यांमध्ये आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा समावेश होता. त्यांनी बिल गेस्ट यांना हैदराबादमध्ये आमंत्रित केले आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्टने हैदराबादमध्ये सेंटर सुरू केले. त्याकाळात भारतातील इन्फोसिस, विप्रो, टीसीएस आदी बड्या आयटी कंपन्यांना चांगल्याच तेजीत होत्या. या कंपन्यांमध्येच आणखी एका नावाचा समावेश होता तो म्हणजे सत्यम कॉम्प्युटर्स या कंपनीचा.

बी. रामलिंग राजू यांनी १९८७ मध्ये स्थापन केलेली ही कंपनी. १९९१मध्ये सत्यमला पहिला मोठा क्लायंट मिळाला आणि मग राजू यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. देशातील बड्या आयटी कंपन्यांमध्ये सत्यमने लवकरच आपले स्थान प्रस्थापित केले. राजू यांच्या कंपनीने अल्प कालावधीतच मोठी झेप घेतली. राजू यांच्यावर पुरस्कारांची बरसात होऊ लागली. लवकरच सत्यम ही देशातील तिसरी मोठी आयटी कंपनी बनली. रामलिंग राजू यांना सिंकदराबादचे बिल गेस्ट म्हटले जाऊ लागले. २००८ पर्यंत सत्यमने ६० देशांमध्ये आपली कार्यालये थाटली आणि कंपनीचा टर्नओव्हर २ अब्ज डॉलर पर्यंत पोहचला होता.

२३ डिसेंबर २००८ या दिवशी अचानक जागतिक बॅंकेने सत्यमवर आठ वर्षांसाठी बंदी घातल्याचे जाहीर केले आणि मोठा भूकंप झाला. सत्यमचा प्रशासकीय दर्जा अतिशय कमी असल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर सत्यम आणि राजू यांचे वाईट दिवस सुरू झाले. ज्या राजू यांना उद्योग जगतातील जागतिक संस्थेकडून मानाचा पुरस्कार देण्यात आला होता त्यांनाच अवघ्या काही महिन्यांत जागतिक बॅंकेच्या बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

'सत्यम'च्या साम्राज्याला ग्रहण

७ जानेवारी २००९मध्ये राजू यांनी कंपनीचे चेअरमपद सोडले. सोबतच एक पत्र सीबेला पाठवले. या पत्राने भारतीय शेअर बाजारात मोठा धरणी कंप झाली. कंपनीची आर्थिक परिस्थिती अनेक वर्षांपासून खराब होती, मात्र बाजारातील पत टिकवून ठेवण्यासाठी कंपनी मोठ्या फायद्यात असल्याचा दिखावा करण्यासाठी मोठी हेराफेरी केल्याचे राजू यांनी पत्रात स्वतःहून मान्य केले. दरम्यान, आपण कंपनीला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले मात्र त्यात यश आले नाही, असा दावा करत राजू यांनी व्हिक्टिम कार्ड वापरण्याचा प्रयत्न केला. सीबीच्या दाव्यानुसार सत्यमने या गैरव्यवहाराच्या माध्यमातून ६ कोटी गुंतवणूकदारांना तब्बल ७ हजार ८०० कोटी रुपयांना चुना लावला होता.

काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने सत्यममध्ये करण्यात आलेली हिराफेरी ही वाघाच्या पाठीवर स्वार होण्याचे धाडस करण्यासारखी होती, असे राजू यांनीच पत्रात नमूद केले आहे. ते पुढे म्हणतात, एकदा वाघाच्या पाठीवर आपण बसू शकतो, मात्र त्यावरून उतरू शकत नाही, कारण खाली उतरल्यास वाघ तुम्हाला खावून टाकणार असतो.

अशी केली हेराफेरी!

१६ डिसेंबर २००८मध्ये कंपनीच्या संचालकांना एक मेल आला. अब्राहम नावाने आलेल्या या मेलमध्ये कंपनीच्या ताळेबंदामध्ये हेराफेरी करण्यात आल्याचे म्हटले होते. त्याच वेळी सत्यम एक रिअल इस्टेट कंपनीचे अधिग्रहण करणार होती. संचालकांनी ही अधिग्रहणाची प्रक्रिया तातडीने थांबविली. कारण रिअल इस्टेट कंपनीचा एक सॉफ्टवेअर कंपनी का खरेदी करते आहे असा प्रश्न उपस्थित झाला. शेअर बाजारत ही बातमी पोहचली आणि सत्यमच्या शेअरने मोठी आपली खाल्ली. ही रिअल इस्टेट कंपनीही राजू यानेच सुरू केली होती.

सत्यम दाखल असलेल्या नफ्यातोट्याच्या गणितामध्येच घोळ केला जात होता. कंपनीचे प्रॉफिट मार्जिन तीन टक्के असताना ते २६ टक्के असल्याचे दाखविले जात होते. त्यासाठी खोटी बिले तयार केली जात होती. दोन प्रकारची बिले छापण्यात येत होती. काही बिले फक्त लपविण्यासाठी वापरली जात होती. कंपनीने साधारण ५ हजार १०० कोटी रुपये किमतीची बिले दडविल्याचे समोर आले आहे.

दरम्यानच्या काळात राजू आणि त्याच्या नातेवाईकांनी हळूहळू कंपनीतील आपल्या हिश्याची विक्री केल्याचेही समोर आले. हेराफेरी करून मिळालेल्या पैशाची गुंतवणूक राजू याने त्याच्यात रिअल इस्टेट कंपनीत केली होती. हैदराबादमध्ये मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती राजू याला मिळाली होती. त्याने आपल्या नातेवाईकांच्या नावाने ३०० कंपन्या काढून मेट्रो सुरू होणार असलेल्या भागातील जमिनीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. कंपनीमध्ये १३ हजार कर्मचारी अतिरिक्त असल्याचे दाखवून त्यांचा पगारही राजूनेच लाटला होता. यातून महिन्याला २० कोटी रुपये राजू हडप करत होता.

घोटाळ्यात अडकलेल्या सत्यमला पुढे टेक महिंद्राने ताब्यात घेतले. हजारो कोटींचा घपला केलेल्या राजूला २०१५मध्ये सात वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. काही महिन्यांतच राजू जामिनावर तुरुंगातून बाहेर आला. पुढचा इतिहास जास्त सांगण्याची गरज नाही. जामिनावर सुटलेल्या राजूने शिक्षेच्या विरोधात अपिल केले आहे, त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि राजू हा हैदराबादेतील आपल्या अलिशान बंगल्यात ऐशोआराम करतो आहे.