Employment
Employment Tendernama
विदर्भ

Yavatmal : 6 हजार 530 कोटींची गुंतवणूक अन् 34 करार; किती जणांना मिळणार रोजगार?

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : जिल्ह्यात उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत 34 उद्योग घटकांसोबत 6 हजार 530 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले.

यावेळी एमआयडीसीचे विभागीय अधिकारी दिगंबर पारधी, कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यपूर्णता विभागाच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, लघु उद्योग भारतीचे विभागीय संघटक रामेश्वर विचेवार, सनदी लेखापाल श्रीदीप इंगोले पाटील, गुरुलक्ष्मी कॉटेक्सच्या निर्यात विभागाचे विक्रम कुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण उपस्थित होते.

जिल्ह्यातील तरुणांची बेरोजगारी दूर करण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. जिल्ह्यात असलेल्या व नव्याने होऊ घातलेल्या सर्व उद्योग घटकांना जिल्ह्यात प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल. जिल्ह्यातील उद्योगक्षेत्रासंबंधी प्रलंबित प्रकरणे निकाली काढले जातील, असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी आश्वस्त केले.

'या' कंपन्यांसोबत झाले सामंजस्य करार 

वितारा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड गुंतवणूक 5000 कोटी, चिंतामणी अँग्रोटेक इंडिया लिमिटेड 300 कोटी, गुरुलक्ष्मी टेक्सटाइल्स प्रायव्हेट लिमिटेड 110 कोटी, अदानी सिमेंट कंपनी 493 कोटी, वैभव स्पिन्टेक्स प्रायव्हेट लिमिटेड 50 कोटी गुंतवणूक होणार आहे.

या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला नव्याने बळकटी मिळेल या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी व्यक्त केला.