NMC
NMC Tendernama
विदर्भ

पाऊस उठला ठेकेदारांच्या मुळावर! शाळेच्या छतातून पाणी थेंब थेंब...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : सध्या पंधरा दिवसांपासून सातत्याने पडत असलेला पाऊस नागपूर महापालिकेच्या कंत्राटदारांचे चांगलेच वाभाडे काढत आहे. वर्षभरापूर्वी उभारण्यात आलेल्या मानकापूर दहनघाटावरील सभागृहाच्या छताला तडे जात आहे, तर दुसरीकडे अलीकडेच डागडुजी केलेल्या सुरेंद्र गढ येथील महापालिकेच्या शाळेच्या छतातून पाणी गळती सुरू झाली आहे.

महापालिकेत कंत्राटदारांची भलीमोठी फौज आहे. आपल्याल टेंडर मिळावे याकरिता सातत्याने चढाओढ सुरू असते. त्यामुळे परवडत नसतानाही कमी किमतीचे टेंडर टाकले जाते. त्यानंतर थातूरमातूर कामे केली जातात. हे प्रशासन व अधिकारी यांना चांगलेच ठाऊक आहे. मात्र सर्वांचा वाटा ठरला असल्याचे कोणीच काही बोलत नाही. काम खराब झाले की नव्याने काम काढले जाते. त्यात दहनघाट, समाजभवनाची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली जातात.

सुरेंद्रगढ येथील महापालिकेच्या शाळेच्या छताला तडे गेले असून, प्लास्टर खाली पडत आहे. अशा स्थितीतही येथील शिक्षक मुलांना शिकवित आहे. या शाळेत जवळपास दोनशेवर मुले आहेत. पावसामुळे जीर्ण झालेले छत कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता या भागातील रहिवासी अभिजित झा यांनी व्यक्त केली. या शाळेची इमारत नव्याने बांधण्यात यावी, तोपर्यंत ही शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मानकापूर येथील दहनघाटावरील सभागृहाचीही हीच स्थिती आहे. या सभागृहाच्या छताला तडे गेले असून, दोन दिवसांपूर्वी प्लास्टरचा मोठा तुकडा खाली पडला. त्यामुळे अंत्ययात्रेत आलेल्या नागरिकांना बाहेर पडावे लागले. काही दिवसांपूर्वी वाठोडा येथील दहनघाटा टिनाचे छत पूर्णपणे सडलेले असून अनेकदा तुकडे झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि प्राशसक राधाकृष्णन आता या संदर्भात काय आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.