पुणे रेल्वे स्थानकाला मिळणार मोठा पर्याय; हे स्टेशन होणार टर्मिनल
पुणे (Pune) : खडकी (Khadki) स्थानकावर रेल्वेचे नवे कोचिंग टर्मिनल होणार आहे. त्यामुळे प्रवासी सुविधा तर वाढतीलच, शिवाय वाहतुकीच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहे. फलाटांच्या संख्येतही वाढ होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा रेल्वे खडकी स्थानकावरून सुटतील. यामुळे पुणे स्थानकावरील ताण हलका होण्यास मदत होईल. येत्या दोन ते तीन वर्षांत हे टर्मिनल उभे राहणार आहे. पुणे स्थानकाजवळील हे दुसरे टर्मिनल तर विभागातील तिसरे टर्मिनल म्हणून ओळखले जाईल.
देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक समजले जाणाऱ्या पुणे स्थानकांवरून धावणाऱ्या गाड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रोज साधारणतः २५० रेल्वे पुणे स्थानकावरून धावतात. फलाट उपलब्ध नसल्याने अनेक गाड्यांना २५ मिनिटे थांबावे लागते. पुणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने खडकी स्थानकावर नवे टर्मिनल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
कसे असणार टर्मिनल
खडकी स्थानकावर सध्या चार फलाट आहेत. पैकी दोन फलाट रेल्वे वाहतुकीसाठी वापरले जातात तर तिसरा रेल लेव्हल फलाट आहे. येथून सैन्याच्या रेल्वेची वाहतूक होते. चौथा फलाट हा माल गाड्यांसाठी वापरला जातो. तो टर्मिनल करताना प्रवासी रेल्वे गाड्यांसाठी बनविला जाईल. खडकी टर्मिनल करताना चारही फलाट हे प्रवासी रेल्वेसाठी वापरले जाणार आहे. शिवाय पादचारी पूल, प्रतिक्षालय, पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृह, मोफत वायफाय, पिण्याची पाण्याची सोय केली जाणार आहे.
प्रवाशांना फायदा काय :
१. पुणे स्थानकावर रेल्वेची संख्या जास्त असल्याने फलाट उपलब्ध न होणे, नव्या गाड्या सुरु न होणे असे प्रकार घडतात. ते बंद होतील.
२. फलाट उपलब्ध नसल्याने अनेक रेल्वेला होम सिग्नलवर वाट पाहत थांबावे लागते. यात २० ते २५ मिनिटे वाया जातात. ते आता थांबेल.
३. नव्या गाड्या सुरु होण्याची शक्यता.
४. पुणे स्थानकावरून दोन मिनिटांत गाडी सुटेल, त्यामुळे फलाट सहज उपलब्ध होतील.
आकडे काय सांगतात :
२५० - पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे
१ लाख ५० हजार - रोजची प्रवासी संख्या
६ - एकूण फलाट
दोन फलाट खडकी स्थानक
४ एक्स्प्रेस व २६ लोकल - रोज थांबणाऱ्या रेल्वे
१५०० - रोजची प्रवासी संख्या
खडकी स्थानकावर नवे टर्मिनल होणार आहे. लवकरच त्याच्या कामास सुरवात होईल. त्यामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
- रेणू शर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे