bus
bus Tendernama
विदर्भ

Good News : आता भंडारा विभागाच्या ताफ्यात 100 इलेक्ट्रिक बस येणार

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : वाढत्या प्रदूषणामुळे वातावरण ढासळले असून वेळी-अवेळी पाऊस, वाढते तापमान हे सर्व याचेच परिणाम दिसून येत आहेत. अशात वाढते इंधनदर व होणारे प्रदूषण यावर इलेक्ट्रिकल वाहनांचा पर्याय रास्त ठरत आहे. हाच प्रयोग राज्य परिवहन महामंडळाकडून अंमलात आणला जाणार आहे. महामंडळाकडून आगारांना इलेक्ट्रिक बसेस दिल्या जाणार असून भंडारा विभागाच्या ताफ्यात 100 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. त्यानुसार, विभागीय कार्यालयाकडून तयारी सुरू झाली आहे.

यात भंडारा व गोंदिया येथे चार्जिंग सेंटर उभारले जाणार आहे. त्यासाठी जागा ठरविण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे नवनवे उपक्रम हाती घेतले आहे. 300 किलोमीटरपर्यंत एका चार्जिंगमध्ये धावणाऱ्या या बसेस राहणार आहेत. सध्या तरी या बसेस गोंदिया- नागपूर मार्गावर चालविल्या जातील जेणेकरून भंडारा येथे त्यांना तेथे चार्ज करता येईल.

इलेक्ट्रिक बस जूननंतर येणार!

इलेक्ट्रिक बससाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी विभागीय कार्यालयाकडून सुरुवात करण्यात आली आहे. यात सर्वप्रथम चार्जिंग सेंटर उभारावे लागणार आहे. यामुळे जून नंतर बसेस येण्याची शक्यता आहे. गोंदिया आगारातील बसेस गोंदिया- नागपूर या मार्गावर चालविल्या जातील. जेणेकरून येथून भंडारा व तेथून नागपूरला बसेस गेल्या तरी त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था तेथे राहणार आहे.

विभागात दोन ठिकाणी चार्जिंग

विभागात एकूण दोन चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागानिश्चितीचे काम सुरु आहे. यातील एक चार्जिंग सेंटर भंडारा येथील विभागीय कार्यशाळेत तर दुसरे गोंदिया आगारात उभारले जाणार आहे. या इलेक्ट्रिक बस मधील वातानुकूलित बस असल्यास तिचे भाडे शिवशाहीपेक्षा कमी व साधारण बसपेक्षा जास्त राहणार आहे. तसेच वातानुकूलित बस नसल्याने भाडे साधारण बस पेक्षाही कमी असणार आहे. विभागाला इलेक्ट्रिक बस मिळणार असतानाच विभागाने 100 साध्या बसचीही मागणी केली आहे. महामंडळाकडून आता त्या बस कधी मिळणार सांगता येत नाही. मात्र, त्या बस मिळाल्यावर आणखी सोयीचे होणार. 100 इलेक्ट्रिक बसमधील 35 बसेस गोंदिया आगाराला दिल्या जातील. यासाठी भंडारा व गोंदिया येथे चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. ही सर्व तयारी झाल्यावर विभागाला बस मिळणार आहेत. सध्या मुख्य मार्गावर या बस धावतील. अशी माहिती भंडाऱ्या चे विभागीय वाहतूक अधिकारी सुरेंद्र वागधरे यांनी दिली.