Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

धक्कादायक! नितीन गडकरींच्या शहरातच सर्वाधिक अपघात

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : देशभरात रस्त्यांचे जाळे विणाणारे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या शहरात सर्वाधिक अपघात झाल्याचे समोर आले आहे. नागपूर शहरात गेल्यावर्षी ९५८ अपघात झाले असून यात २६८ लोकांचा मृत्यू झाल्याची बाब रस्ते अपघात अहवालातून पुढे आली. रस्ते अपघातात नागपूर राज्यात दुसरा क्रमांकावर तर देशात २५ व्या क्रमांकावर आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयच्यावतीने २०२१ ची आकडेवारी नुकताच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार वाढती लोकसंख्या, रस्त्यावर वाहनांची पार्किंग, त्यामुळे रस्ते अरुंद होत असून रस्त्यावरील वाहतूक कोंडी होणे हे रस्ते अपघाताचे मुख्य कारण असल्याचे अहवालात नोंदविले आहे. त्यातच बेजबाबदारपणे वाहन चालविणेही याला कारणीभूत आहे. या अहवालात देशातील १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ५० शहरांची आकडेवारी दिली आहे. वर्ष २०२१ मध्ये ५० शहरांत एकूण ६७ हजार ३०१ रस्ते अपघातांची नोंद असून १५ हजार ३५० लोकांचा मृत्यू झाला. ५८ हजार ७५८ व्यक्ती जखमी झाले आहेत.

अहवालानुसार देशात रस्ते अपघातात शहराचा २५ वा क्रमांक असून मृत्यूची संख्येत २३ वा क्रमांक लागतो. तर जखमीच्या संख्येत २३व्या स्थानी आहे. मागील वर्षी शहरात ७७३ रस्ते अपघात, २१० मृत्यू तर ७५२ जखमींच्या झाले आहेत. यानुसार अनुक्रमे देशात २६, २५ व २३ व्या स्थानी नागपूरचा क्रमांक होता.

अपघाताची कारणे
पोलिस चौकात असल्यास वाहन चालक हेल्मेट, सीटबेल्ट, वेग आणि अन्य नियमानुसार वाहन चालवतो. परंतु, वाहतूक पोलीस चौकाऐवजी इतरत्र असल्यास सुसाट वाहने पळवतात. तर अनेक जण वाहतूक नियम न पाळल्यामुळे अपघातास बळी पडतात. मद्यप्राशन, अतिवेग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे, सिग्नल तोडून वाहने पळविणे अशी अनेक कारणे अपघातास कारणीभूत असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे.