School Tendernama
विदर्भ

गणवेशाची फाईल खो-खोच्या खेळात हरवली; विद्यार्थी गणवेशाविनाच

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : ओबीसी व खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना या सत्रात गणवेश देण्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता. परंतु संबधीत फाईल शिक्षण विभागात तब्बल सहा महिने टेबल टेबलच्या खेळात हरवून गेल्याने सर्व दावे फोल ठरलेत.

आता शैक्षणिक सत्र संपत आल्याने विद्यार्थ्यांना यंदा गणवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. शैक्षणिक सत्र संपण्याच्या मार्गावर असल्याने यंदा गणवेश देणे शक्य होणार नसून पुढील सत्रात देण्याबाबतचे पत्र प्रशासनाने सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. सत्ताधाऱ्‍यांच्या अनास्थेचा फटका विद्यार्थांना बसला.

वर्ष २०२०-२१ मध्ये या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४५ लाखांची तरतूद करण्यात आली होती. १३ हजारांवर विद्यार्थ्यांना प्रती गणवेशासाठी ३०० रुपयाप्रमाणे ३९ लाख रुपये खर्च झाला होता. त्यामुळे वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता तरतूद घटवून ती ४० करण्यात आली. त्यानंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी ओबीसी व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या पाठविली. ही संख्या १६ हजार ६६६ वर होती. त्यानुसार ४९ लाख ९९ हजार ८०० रुपयांच्या निधीची गरज होती. त्यामुळे शिक्षण विभागाला ४९ लाखांच्या निधीची फाइल तयार करावा लागली. ऐरवी खर्चाची फाइल शिक्षण विभागाकडून लवकर तयार करून मंजूर करण्यात येते. परंतु गणवेशाच्या फाइलला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागला.

आता सत्र संपुष्ठात येण्याच्या तोंडावर जि. प. कडून पंचायत समिती स्तरावर गणवेश निधी वळता करण्यात आला. यंदाचे शैक्षणिक सत्र संपुष्ठात येण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहे. यात गणवेश खरेदीची सर्व प्रक्रिया पार पाडणे जवळपास अशक्यच आहे. त्यामुळे यंदा हे गणवेश न देता पुढील सत्रात गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील सत्रात दोन गणवेश

विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्यात येते. यावर्षी गणवेश मिळणार नाही. त्यामुळे पुढील सत्रात दोन गणवेश मिळतील, अशी अपेक्षा शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.