road
road Tendernama
विदर्भ

Bhandara : 'या' तीन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गावरील चौक ठरतोय अपघाताचे 'हॉटस्पॉट'

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : रस्ते हे गुणवत्तापूर्ण व अपघातरहित असावेत असा नियम आहे. महामार्ग प्राधिकरण त्याकडे कटाक्षाने लक्ष देते. मात्र तीन जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्गावरील खापा येथील चौफुली चौक अपघाताचे हॉटस्पॉट ठरत आहे. अपघात रोखण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरला आहे. आतापर्यंत चौफुलीवर अनेक लहान मोठे अपघात घडून निष्पाप जीव गमवावा लागला आहे.

तुमसर, रामटेक, गोंदिया, भंडारा तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट या राष्ट्रीय महामार्गाचा जोड आहे. अतिशय वर्दळीचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. खापा येथे या तिन्ही जिल्ह्यांना हा राष्ट्रीय मार्ग छेदून जातो. येथील चौफुली अपघाताची हॉटस्पॉट बनली आहे. ही चौफुली रुंद आहे. तुमसर शहरात प्रवेश करताना याच चौफुलीतून जावे लागते. गोंदिया व महामार्ग येथूनच जातो. बालाघाट येथे जाण्याकरिता या चौफुलीवरून वाहने जातात. परंतु मागील काही महिन्यांपासून या चौफुलीवर तसेच चौफुलीवरील समोर रस्त्यावर लहान मोठे अनेक अपघात घडले. त्यात काहींना गंभीर जखमा झाल्या तर काहींना आपल्या प्राणास मुकावे लागले. बांधकामादरम्यान त्यात काही तांत्रिक बिघाड निर्माण झाले काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. परंतु त्याकडेही बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही.

पोलिस चौकी नावाचीच : 

पोलिस प्रशासनाने येथे नाममात्र पोलिस चौकी उभारली, परंतु वाहन तपासणीदरम्यान येथे पोलिस कर्तव्य बजावताना दिसतात. उर्वरित वेळी येथे कोणीही उपस्थित राहत नाही. या चौफुलीवर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत, परंतु येथे उपयोग होताना दिसत नाही.

व्हीआयपीचा प्रवास :

या महामार्गावरून अनेक व्हीआयपी लोकप्रतिनिधी दररोज प्रवास करतात. परंतु त्यांनीही या चौफुलीवर होणाऱ्या अपघाताबाबत जाब विचारल्याचे दिसून येत नाही. सर्वसामान्य प्रवाशांचा जीव येथे धोक्यात असूनही या प्रमुख बाबीकडे कोणाचेच लक्ष का जात नाही. असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष :

राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करताना कोणत्याही तांत्रिक त्रुटी निर्माण होऊ नये याच्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विशेष लक्ष देते. परंतु खापा चौफुली येथे मागील तीन वर्षापासून सतत अपघात घडत असतानाही त्याकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष दिसत आहे.