Amravati ZP Tendernama
विदर्भ

Amravati : जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळा; वरिष्ठ सहायकावर निलंबनाची कारवाई

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : जिल्हा परिषदेत निविदा घोटाळा समोर आला असून या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागातील एका वरिष्ठ सहायकास निलंबित केले आहे. प्रवीण वानखडे, असे निलंबित कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू झाल्यापासून अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. बांधकाम विभागात कोट्यवधी रुपयांची कामे असून त्याची निविदा काढण्याचा सपाटा मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. ज्या अटींना शासनाचा आधार नाही, अशा जाचक अटी टाकून अधिकारी काही निवडक कंत्राटदारांना कामे देत असल्याचा आरोप कंत्राटदार महासंघ तसेच युवक काँग्रेसकडून करण्यात आला होता. विशेष म्हणजे मार्च २०२४ पसून कंत्राटदारांकडून सातत्याने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे पदाधिकारी समीर जवंजाळ यांनी दिली. मागील आठ ते नऊ महिन्यांत कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या असून त्या मर्जीतील लोकांना देण्यात येत असून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मात्र कामापासून वंचित ठेवले जाते, असा आरोपही करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेत सुशिक्षित बेरोजगारांना डावलण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे जि. प. बांधकाम विभागात काढण्यात येत असलेल्या निविदेत जाचक अटी लावून मर्जीतील कंत्राटदारांना कंत्राटे देण्याचा सपाटा सुरू होता, असाही आरोप कंत्राटदार महासंघाने केला आहे.

बडे मासे अद्यापही मोकळे

निविदाप्रक्रियेत मोठे अधिकारी सहभागी असताना तक्रार झाल्याने केवळ एका सामान्य कर्मचाऱ्याचा बळी घेण्यात आला आहे. याप्रकरणातील बडे मासे अद्यापही मोकळे असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणी वरिष्ठ सहायक प्रवीण वानखडे यांच्याकडे निविदाप्रक्रिया करण्याची जबाबदारी होती. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालानंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

- संजिता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.