Nagpur Tendernama
विदर्भ

Nitin Gadkari: मंत्री गडकरींची नागपुरात आणखी एका प्रकल्पाची घोषणा

Nagpur: 9 ठिकाणी साकारणार भव्य व्यापारी संकुल

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूरमधील लहान मोठ्या व्यावसायिकांना व्यवसायाच्या उत्तम अशा वातानुकूलित सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने 9 ठिकाणी भव्य मार्केट संकुल आपण साकारणार आहोत. मेडिकल चौक येथे एक भव्य उड्डाणपूल साकारून दिल्लीच्या पालिका बाजारच्या धर्तीवर मोठे मार्केट त्या ठिकाणी उभारण्याचे नियोजन असल्याचे सूतोवाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अमरावती मार्गावरील ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते. अनेक महामार्ग व उड्डाणपुलांचे उद्घाटने मी केली. या ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे लोकार्पण करतांना मनात एक पोकळी व अनेक आठवणींची सोबत असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आपले भावनिक बंध आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले.

राजकारणातील आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहावे अशा निवडक व्यक्तीमत्वांपैकी डॉ. श्रीकांत जिचकार यांचे नाव आर्वजून घ्यावे लागेल. त्यांच्या कृतज्ञतेपोटी या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याच्या कल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ होकार देत विद्यापीठाकडे जाणारा हा पूल आता खऱ्या अर्थाने ज्ञानयोगी मार्ग झाल्याचे ते म्हणाले.

नागपूर पासून विद्यापीठाचे अंतर या उड्डाणपुलामुळे आता कमी झाले आहे. या महानगरातील सर्व सेवासुविधांचा विचार करतांना येथील सांस्कृतिक, कला, क्रीडा, लहान मोठे व्यवसाय याला जपणारे महानगर म्हणून ओळख निर्माण व्हावी यावर आम्ही भर दिला आहे. नागपूर महानगरात येत्या काळात 300 ठिकाणी खेळांची मैदाने साकारले जातील.

यातून सूमारे एक लाख मुले दररोज मैदानावर खेळतील. त्यांच्या कलागुणांना, क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी विविध क्रीडा महोत्सव, स्पर्धा, कला महोत्सव यातून संधी देऊन राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू यातून घडतील असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.