Nandgram Nagpur
Nandgram Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : रखडलेल्या नंदग्राम प्रकल्पाला गती मिळणार का?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : तब्बल 12 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नंदग्राम योजनेला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नंदग्राम योजनेसाठी 104 कोटींची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात केल्याची माहिती मनपा घनकचरा व्यवस्थापन संचालक तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

शहरातील गायींचे गोठे वाठोडा येथे नेण्याबाबत नंदग्राम प्रकल्प आखण्यात आला होता. हा प्रकल्प तब्बल 12 वर्षांपासून निधीअभावी प्रलंबित आहे. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा नागपुरचे सुनील केदार हे पशुसंवर्धनमंत्री होते. त्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनपाने नंदग्रामचा प्रस्ताव पाठविला होता. परंतु, निधी तर मिळाला नाही, उलट महाविकास आघाडीचे सरकार गडगडले. त्यानंतर सेना-भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मनपाच्या आशा पल्लवित झाल्या.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्थायी समिती अध्यक्ष असताना ही योजना आणली होती. त्यानंतर गेल्या 12 वर्षांत सभागृहात एखादवेळी या योजनेची केवळ चर्चा झाली. दयाशंकर तिवारी हे महापौर झाल्यानंतर त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, ते निष्फळ ठरले.

वाठोड्यात 44 एकरात नंदग्राम तयार करण्यात येणार होते. त्यावेळी 39 कोटी रुपयांचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. परंतु तिवारी यांचा स्थायी समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर इतर प्रस्तावाप्रमाणे हा प्रस्तावही अडगळीत गेला. आता या प्रकल्पाची किंमत 104 कोटीवर पोहचली आहे.

याठिकाणी 357 गोठे तयार करण्यात येणार आहेत. एका गोठ्यात दहा गायींची सुविधा राहणार आहे. एकूण 3,570 गायींना येथे ठेवता येणार आहे. याठिकाणी दूध संकलनासाठी कोल्ड स्टोरेज, वीज, पाणी, गायींच्या शेणापासून बायोगॅसचा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे.

गायींना ठेवण्यासोबतच त्यांना फिरण्यासाठी मोकळ्या जागेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दोन एकरचे एक मैदान, अशी दोन मैदाने तयार करण्यात येणार आहेत. या भागात गायींना फिरता येणार आहे. या योजनेमुळे शहरातील रस्त्यावरील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.