Railway Track
Railway Track Tendernama
विदर्भ

Nagpur : कधी पूर्ण होणार इतवारी - नागभीड रेल्वे लाईनचे स्वप्न?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर - नागभीड रेल्वे लाईन (Nagpur - Nagbhid Railway Line) बंद होऊन अनेक वर्षे झाली आहे. आता ही लाईन वनक्षेत्रातून जाणार असल्याने ती प्रत्यक्षात येण्यासही काही वर्षे लागणार आहेत. हा संपूर्ण परिसर 38 किलोमीटर आहे, मात्र आतापर्यंत यासाठी वनविभागाची परवानगी मिळालेली नाही. राज्यस्तरावरच हा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. अशा स्थितीत राष्ट्रीय स्तरावर परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेला बराच कालावधी लागू शकतो. 

वर्षापूर्वी इतवारी-नागभीड मार्गावर नॅरोगेज गाड्या धावत होत्या, त्या दररोज हाऊसफुल्ल होत्या. या मार्गाला गती देण्यासाठी 2018 मध्ये ती पूर्णपणे बंद करून ब्रॉडगेज मार्गाचे काम सुरू करण्यात आले. या रकमेबाबत आधी टाळाटाळ केली जात होती, मात्र अखेर राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून खर्च उचलण्याची माहिती समोर आली. याला पूर्ण करण्याची जबाबदारी एमआयआरडीसीकडे देण्यात आली. त्याचे कामही विभागाने सुरू केले आहे.

इतवारी - नागभीड लाईनसाठी 86 कोटी 

यंदाच्या अर्थसंकल्पात 86 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचे काम लवकरच पूर्ण करण्याचा अंदाज होता, मात्र आता वनविभागाने या मार्गावर अडथडा निर्माण केला आहे. प्रत्यक्षात 104 किलोमीटर मार्गावर उमरेड-नागभीड या मार्गादरम्यान 38 किलोमीटरचे वन्यजीव क्षेत्र येत आहे. ही लाईन प्रत्यक्षात आणण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. मात्र सध्यास्थितीत वनविभागाची परवानगी दिली जात नाही. उर्वरित लाईनचे काम पूर्ण होऊनही 38 किलोमीटरची लाईन वर्षानुवर्षे अपूर्ण राहिल्याचे चित्र समोर दिसत आहे.

उमरेड ते नागभीड हे एकूण अंतर 38 किलोमीटर आहे. ही लाईन वनविभागाच्या हद्दीत येते. येथे काम करण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असून, ती अद्याप मिळालेली नाही. सध्या हा प्रस्ताव केवळ राज्यस्तरावर आहे, अशी माहिती एमआयआरडीसीचे ग्रुप महाव्यवस्थापक डी. टेबर्णे यांनी दिली.