Bridge
Bridge Tendernama
विदर्भ

Nagpur : 'या' नदीवरील कोसळलेल्या पुलाच्या चौकशीचे काय झाले? कारवाईच करायची नव्हती तर...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (पारशिवनी) : पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली पेच नदीवरील साडे बारा कोटी रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेला पूल नदीच्या पुरात 28 ऑगस्ट 2020 ला वाहून गेला होता. त्यावेळी पेच जलाशयातून पेच नदीपात्रात 16 वक्र दारातून 4.5 मीटर वेगाने 6016.80 क्यूमेक्स पाण्याच्या विसर्ग करण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन अभियंता नागदिवे यांनी मनमर्जीने पेच नदीपात्रात पाण्याच्या विसर्ग केल्याने पेच नदीला महापूर आला होता. असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी वेळी केला होता.

त्यातच दीड दोन‌ वर्षांआधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आलेला पेच नदी वरील सालई माहुली पूल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. तर नदी काठावरील शेतजमीनी शेतपिकासह खरवडून वाहून गेल्या होत्या. हजारो घरामध्ये पाणी शिरल्याने वित्तहानी झाली होती. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेडा धातला होता. जिवितहानी सह धोका निर्माण झाला होता. 

पुलाचे बांधकाम निकृष्ट

पुराच्या पाण्यात पूल वाहून गेल्यावर या बाबतीत चौकशी समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण थंडबस्त्यात गेले. बांधकामात तत्कालीन बाधकाम अभियंता, तत्कालीन कंत्राटदार व इतर जर दोषी नव्हते तर पूल कोसळलाच कसा? जर बांधकामाचा दर्जा निकृष्ट होता तर काय कारवाई झाली, याचा आजपर्यंत थांगपत्ता लागू शकला नाही. या पुलाच्या बांधकामात अनेकांनी हात धुतले असल्यानेच निकृष्ट पुलाचे बांधकाम तर करण्यात आले‌ नाही ना? जर अधिकारी कंत्राटदार दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

या प्रकरणात नेतेमंडळींच्या जवळच्या कंत्राटदाराला या पुलाचे बांधकाम देण्यात आल्याची चर्चा आहे. राजकीय दडपण असल्याने हे प्रकरण थंडबस्त्यात गेले असावे, असा कयास लावण्यात येत आहे.

या पुलाच्या बांधकामांवर साडेबारा कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. पूल उभा झाला रहदारी करीता ग्रामीण भागातील नागरीकांसाठी उपयोगाच्या ठरण्याअगोदरच वर्ष-दीड वर्षातच पेच नदीला आलेल्या पुरात हा पूल वाहून गेला. ज्यात या पुलाचे चार पिल्लर जमीनदोस्त झाले तर वरील स्लॅपने नदी पात्रात जलसमाधी घेतली.

या पुलाच्या उभारणीकरता एका नावाजलेल्या कंपनीला टेंडर मिळाले होते. त्याकरीता साडेबारा कोटी रुपये या पुलाच्या बांधकामाला खर्च आला.‌ पूल तयार झाला असता त्यावेळी असलेले तत्कालीन आमदार यांनी मोठा गाजावाजाकरीत या पुलाचे तत्कालीन पालकमंत्र्यांच्या हस्ते  पुलाच्या लोकार्पणनाचे आयोजन केले होते. त्याच वेळी माजी आमदार यांना सुद्धा लोकार्पण प्रसंगी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र श्रेयवादावरून मोठे तांडव आजी-माजी आमदार यांच्यात उद्धाटन प्रसंगी पाहायला मिळाले.

बांधकाम विभागाने कोसळलेल्या पुलावर सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने दोन युवक तुटक्या पुलावरून नदीपात्रात पडल्याने मृत्युमुखी पडले. जर वेळीच तुटक्या पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था केली गेली असती तर किंवा पुलावर सुरक्षा भिंत वेळीच बांधण्यात आली असती तर या युवकांचा पुलावरून पडून मृत्यू झाला नसता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.