New Nagpur
New Nagpur Tendernama
विदर्भ

Nagpur : नवीन नागपूरचा जानेवारीत फुटणार नारळ? 750 कोटींच्या कामांचा 'असा' आहे प्लॅन

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवीन नागपूरच्या संकल्पनेला नव्या वर्षात वेग येणार आहे. एनएमआरडीए क्षेत्रातील 24 गावांमध्ये 1 हजार 353 कोटी रुपयांतून एक हजार किमीचे जलवाहिनी, सिवेज लाईनचे जाळे तयार करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा 24 गावांतील साडेआठ लाख नागरिकांना लाभ होणार आहे.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाचा (NMRDA) 1 हजार 353 कोटींच्या विकासकामांचा प्रस्ताव नगरविकास विभागाने मागील वर्षी मंजूर केला होता. यातील कामांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली. टेंडरवर निर्णय घेण्यासाठी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत टेंडरला मंजुरीनंतर पुढील महिन्यांत विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या अमृत-2 या योजनेंतर्गत एनएमआरडीएच्या सेक्टर साऊथ बी सेक्टरमध्ये समावेश असलेली 13 व ईस्ट ए सेक्टरमध्ये समावेश असलेल्या 11 गावांमध्ये विकासकामे होणार आहे. या प्रकल्पाचा लाभ 81 चौरस किमी क्षेत्रातील नागरिकांना होणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत साऊथ बी सेक्टरमध्ये 565.25 कोटींच्या जलवाहिनीचे जाळे टाकण्यात येणार आहे. एकूण 565 किमीचे जलवाहिनीचे जाळे पसरविण्यात येणार आहे. यात साथऊ बीमध्ये 220.90 कोटी तर ईस्ट एमध्ये 344.36 कोटी खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय 788.87 कोटींचा सिवेज लाईनचे जाळे पसरविण्याचाही प्रकल्प आहे.

दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह 522 किमी अंतराच्या सिवेज लाईन तयार करण्यात येणार आहे. यातील साऊथ बीमध्ये 220 तर ईस्ट एमध्ये 302 किमीच्या सिवेज लाईनचे जाळे तयार करण्यात येणार आहे. या सर्व कामांच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. टेंडर मंजुरीनंतर कार्यादेश दिले जाणार असून, पुढील महिन्यात भूमिपूजन होईल.

प्रकल्पात या गावांचा समावेश

सेक्टर साऊथ 'बी' मध्ये बेसा, बेलतरोडी, पिपळा, घोगली, हुडकेश्वर खुर्द, शंकरपूर, गोटाळपांजरी, वेळाहरी, रुई, वरोडा, पांजरी, किरणापूर, कन्हाळ गाव या गावांचा समावेश आहे. ईस्ट 'ए' मध्ये पांढुर्णा, तरोडी खुर्द, तरोडी बुजूर्ग, बीडगाव, कापसी खुर्द, पोवारी, अड्याळी, विहिरगाव, गोनी सिम, खरबी, बहादुरा या गावांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. अमृत-2 योजनेंतर्गत एनएमआरडीए क्षेत्रात सिवेज लाईन व जलवाहिनीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. येत्या जानेवारीत भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प नवीन नागपूरचा पाया रचणारा ठरणार आहे, अशी माहिती एनएमआरडीए आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली.