Pothole
Pothole Tendernama
विदर्भ

रस्त्यांवरील खड्ड्यांत यमराज!; मनपासह संबंधित विभागापुढे लावणार...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : शहरात गणेशोत्सव तोंडावर असून अद्यापही महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने खड्ड्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे नागपूर सिटीझन फोरमचे समन्वयक रजत पडोळे यांनी यमराजाची वेशभूषा करून खड्ड्यांतून जाणाऱ्या नागरिकांना सावध केले. चक्क यमराजच रस्त्यावर बघून नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

नागपूर सिटीझन फोरमने नागपूर-अमरावती महामार्ग व गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे लक्ष वेधन्यासाठी दाखवा-झोपेतून जागवा अभियानाला सुरुवात केली. नागपूर विद्यापीठ कॅम्पस परिसर ते वाडी नाक्यापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली असून जागोजागी बारिक गिट्टीचा सडा पडला आहे. या महामार्गावर दररोज लहान मोठे अपघात होत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या समस्येकडे लक्ष वेधन्यासाठी रजत पडोळे यांनी यमराजाची वेशभूषा करून रस्त्यांवरील वाहनचालकांची वाहने थांबवून त्यांना सावध केले. जे लोक या रस्त्यांवरुन प्रवास करीत आहेत, त्यांना मृत्यूलोकात घेऊन जायला यमराज आले आहेत, हे अधोरेखित करणारे पथनाट्य यावेळी सादर करण्यात आले.

या आंदोलनात फोरमचे सदस्य अभिजीत सिंह चंदेल, अमित बांदूरकर, अभिजीत झा, अमेय पन्नासे, रिया पिंपळकर, अमोल अगस्ती, अंगिरा पांडे, सोमनाथ जाधव, गौरव देशपांडे, शिवम उमरेडकर, प्रज्वल गोड्डे, रुपेश चौधरी, संकेत महाले, सुरेश चौधरी, आयुष चांभारे, संदेश उके, स्वप्नील भालधरे, केतन रणदिवे यांच्यासह या रस्त्यांवरुन दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सहभाग घेतला. या आंदोलनाच्या माध्यमातून झोपी गेलेल्या महापालिका, सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न असल्याचे फोरमचे समन्वयक रजत पडोळे यांनी सांगितले. लाईव सिटी एप, ट्वीटर व फेसबूक यासारख्या समाज माध्यमातून होणाऱ्या तक्रारींची प्रशासन दखल घेत नसल्याने नाईलाजाने आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले.