Nitin Gadkari, Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

Nagpur Infra Update: नागपुरातील 'त्या' प्रकल्पांबाबत CM फडणवीसांनी घेतली कडक भूमिका; काय दिले आदेश?

Devendra Fadnavis: रस्ते, बाजार, पाणीपुरवठा, पुनर्विकास प्रकल्पांवर उच्चस्तरीय आढावा; अतिक्रमणांवरही कारवाईचे निर्देश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई/नागपूर (Mumbai/Nagpur): नागपूर शहरातील पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी संबंधित यंत्रणांना दिले. शहरातील रस्ते, बाजार, पाणीपुरवठा आणि पुनर्विकास प्रकल्पांचा उच्चस्तरीय आढावा घेताना त्यांनी कामांच्या गतीवर भर दिला.

नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयात झालेल्या बैठकीत महानगरपालिका, एमएसआयडीसी, मिहान, क्रीडा संकुल, वैद्यकीय सुविधा आणि म्हाडा अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सविस्तर आढावा घेतला. नागपूर शहरातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती द्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीत शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर झोननिहाय भाजी बाजार, मटन-मच्छी मार्केट, फूड मॉल आणि हॉकर झोन उभारण्याचा निर्णय चर्चेत आला. या प्रकल्पांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले.

शहरातील अतिक्रमणांचा प्रश्नही बैठकीत चर्चिला गेला. शाळा आणि महाविद्यालय परिसरातील अवैध टपऱ्या, पानमसाल्याची दुकाने तसेच मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले.

रस्ते विकासाच्या दृष्टीने पाचव्या टप्प्यातील सिमेंट रस्ते प्रकल्पांतर्गत ९ झोनमध्ये ८९ किलोमीटरचे १३५ रस्ते उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी गळती रोखण्यावर विशेष भर देण्यात आला.

कचरा व्यवस्थापनासाठी राज्यातील इतर शहरांतील यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केट आणि डीग दवाखाना यांच्या पुनर्विकासाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

दाभा येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, यशवंत स्टेडियम पुनर्विकास, नाग व पोहरा नदी प्रकल्प तसेच सांडपाणी व्यवस्थापन योजनांवरही चर्चा झाली.

या सर्व प्रकल्पांची गुणवत्ता राखत निर्धारित वेळेत पूर्णता सुनिश्चित करण्यावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सचिवालयात (हैदराबाद हाऊस) येथे झालेल्या या बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार मोहन मते, कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, गृह निर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी यावेळी उपस्थित होते.

आढावा बैठकीत काय झाले निर्णय?

  • नागपूर प्रकल्पांवर CM फडणवीसांचा उच्चस्तरीय आढावा

  • ८९ किमी सिमेंट रस्त्यांचे नियोजन

  • झोननिहाय बाजार व हॉकर झोन उभारणी

  • अतिक्रमण हटवण्याचे कडक निर्देश

  • पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनावर भर