Nagpur ZP
Nagpur ZP Tendernama
विदर्भ

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील आशा सेविकांना स्मार्ट करणारी बातमी; 2 कोटींतून प्रत्येकीला मिळणार...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक आशा सेविकेला एन्ड्रॉइड मोबाईल (Android Mobile Phone) मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या (ZP) उपाध्यक्षा व आरोग्य समिती सभापती कुंदा राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर मोबाइलसाठी निधी उपलब्ध झाला आहे. प्रत्येक आशा सेविकेकडे मोबाईल असल्याने आरोग्यविषयक माहिती तातडीने शासन व मुख्यालयास उपलब्ध होण्यास मदत होईल. 

आशा सेविकांचे काम स्मार्ट होणार असल्याने आरोग्य यंत्रणा देखील गतीशील होण्यास मदत होईल. गाव-पाड्यापासून सर्वदूर अगदी शेवटच्या स्तराच्या आरोग्याची नाडी आशा सेविकांना माहिती असते. त्यांच्या माध्यमातूनच शासनाच्या आरोग्यविषयक योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचतात. विविध आरोग्य विषयक कार्यक्रम राबविले जात असतानाच त्यांच्याकडून अनेक प्रकारच्या ऑनलाइन सॉफ्टवेअरवर विविध प्रकारची माहिती भरून घेतली जाते. पण अनेक आशा सेविकांकडे ॲन्ड्रॉइड मोबाईल नसल्याचे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य समितीने त्यांना मोबाइल देण्याचा निर्णय घेतला. 

13 तालुक्यांतील सर्व आशा स्वयंसेवकांना एन्ड्रॉईड मोबाईल खरेदी करून देण्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे निधीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. माजी मंत्री तथा आमदार सुनील केदार यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार 1910 आशा स्वयंसेविकांसाठी प्रती मोबाईल 9,999 रुपये प्रमाणे एन्ड्रॉईड मोबाईल खरेदीसाठी 1,90,98,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

एन्ड्रॉइड मोबाईल नसल्याने अडचणी येत होत्या. परंतु आता ही अडचण दूर होईल. आशा सेविकांसाठी मोबाइल खरेदीची प्रक्रिया शासनाच्या पोर्टलवरून करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यामुळे आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे पुरविण्यास मदत होईल, अशी माहिती जि.प. उपाध्यक्ष व आरोग्य सभापती कुंदा राऊत यांनी दिली.