Nitin Gadkari, Devendra Fadnavis
Nitin Gadkari, Devendra Fadnavis Tendernama
विदर्भ

Nagpur: गडकरी, फडणवीसांची नागपुरात मोठी घोषणा

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : माजी मंत्री आणि आमदार नितीन राऊत (Nitin Raut) यांचा गड मानल्या जाणाऱ्या उत्तर नागपूरच्या विविध प्रकल्पांना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. उत्तर नागपूरच्या कामात भेदभाव केला जात नाही किंवा केला जाणार नाही, अशी ग्वाही गडकरी आणि फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रम दरम्यान दिली. उभय नेत्यांनी उत्तर नागपुरात करण्यात आलेली विकास कामे तसेच प्रस्तावित कामांचा उल्लेख करीत शहराच्या समतोल विकासाला प्राधान्य असल्याचे सांगितले.

उत्तर नागपुरातील कामठी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. गडकरी यांनी सांगितले की, या कन्वेंशन सेंटरची संकल्पना नितीन राऊत यांची होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी 80 कोटी रुपये दिले. उ

त्तर नागपुरातील कमाल चौक ते दीघोरीपर्यंत एक हजार कोटींचा उड्डाणपूल तयार होत आहे. कमाल चौकात मार्केट तयार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडून 80 हजार कोटी रुपये मंजूर केले. उत्तर नागपुरातील मैदानाच्या विकासासाठी फडणवीस यांनी 100 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली. उत्तर नागपुरात रेल्वेचे भूमीगत मार्ग मंजूर केले आहेत. पिवळी नदी पूल, सांडपाणी प्रक्रिया केंद्रासह अनेक कामांमुळे उत्तर नागपूरचा विकास होईल, असे ते म्हणाले. शहराचा समतोल विकास हाच प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

कन्व्हेन्शन सेंटर लग्नासाठी दिले तर खबरदार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने तयार या कन्वेंशन सेंटरमध्ये संशोधनाचे कार्य व्हावे. गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यावर संशोधन झाले पाहिजे. परंतु हे कन्वेंशन सेंटर लग्न कार्यासाठी भाड्याने देऊ नये. लग्न कार्यासाठी भाड्याने दिल्यास मी स्वतः येथे बसून आंदोलन करेल, असा इशारा यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

उत्तर नागपुरात मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल

नितीन राऊत यांनी उत्तर नागपुरात हॉस्पिटलचा मुद्दा मांडला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर नागपुरात मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल बांधण्यात येणार असून संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचे सांगितले. यापूर्वी येथे पीपीपी मॉडेलनुसार हॉस्पिटल तयार करण्यात येणार होते. परंतु पीपीपी मॉडेलनुसार बांधकाम झाले तर येथील नागरिकांना आरोग्य सुविधा परवडणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प दुसरीकडे करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. उत्तर नागपूरच्या विकासाच्या ज्या संकल्पना पुढे येतील, त्याला राज्य सरकार बळ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लेंडी व नाईक तलावाच्या कामाचे भूमिपूजन

अनेक दशके दुर्लक्षित असलेल्या नाईक व लेंडी तलावांच्या कामाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. नाईक तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी 12.95 कोटी तर लेंडी तलावासाठी 14.13 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. लेंडी तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी महापालिकेला अतिक्रमणामुळे चांगलीच कसरत करावी लागणार आहे.