NMC Tendernama
विदर्भ

Nagpur: नदी, नाल्यांची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी दिले 'हे' आदेश

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात नदी, नाल्यांची स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदारांच्या शेकडो तक्रारी येत असल्याने महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी प्रत्यक्ष नदी किनारी जाऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नदी, नाल्याच्या किनाऱ्यावरील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी केलेल्या तक्रारी तत्काळ दूर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पावसाळ्यामध्ये पूरपरिस्थिती टाळण्यासाठी नद्या व नाल्यांची स्वच्छता महापालिकेने सुरू केली आहे. नाग, पिवळी आणि पोहरा या तिनही नद्यांसह नाल्यांची सफाई करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात नदी आणि नाल्याची सफाई पूर्ण करण्याचे प्रयत्न स्वच्छता विभागाचे आहेत.

नदीनाल्यातील गाळ काढून शेजारीच टाकला जात आहे. पावसामुळे हा गाळ पुन्हा नदीच्या प्रवाहात येणार आहे. ही कंत्राटादारांची सोय असल्याची चर्चा आहे. गाळ काढण्याचे कंत्राट आम्ही घेतले. मात्र काढलेला गाळ कुठे टाकायचा हे महापालिकेने सांगितले नाही. त्यासाठी जागेची व्यवस्था करून दिली नाही. गाळ बाजूला काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करणे हाच उद्देश आहे. त्यामुळे घोटाळे वगैरे झाले नसल्याचा दावा कंत्राटदारांचा आहे.

असे असले तरी आयुक्तांनी महाराजबाग उद्यानातून वाहणारा नाला, वेस्टर्न कोलफिल्डमधील विकासनगर नाला, फ्रेंड्स कॉलनी येथील नाला, एसआरए बिल्डिंगमधील पिवळी नदीचा भाग, मानकापूर सदिच्छा कॉलनी येथील नाला आणि राजपूत हॉटेल ते अशोक चौककडे वाहणाऱ्या नॉर्थ कॅनलची पाहणी केली. यावेळी आयुक्तांना पुलाखाली मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आला. फ्रेन्डस कॉलनीतील नाल्यातही कचरा दिसून आला. त्यांनी सदिच्छा कॉलनी आणि झिंगाबाई टाकळी येथे नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी नागरिकांनी नाल्यामुळे होणाऱ्या समस्या आयुक्तांपुढे मांडल्या. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारीवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. नदी, नाल्यांच्या संदर्भात नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी राहू नयेत, नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकू नये यादृष्टीन झोन स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. स्वच्छता केल्यानंतरही नदी, नाल्यांमध्ये कचरा जमा होणार नाही, त्यासाठी जनजागृती करणे तसेच आवश्यक उपाययोजना करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.