Sanjay Rathod
Sanjay Rathod Tendernama
विदर्भ

विदर्भातील 'या' तलावांच्या दुरूस्तीसाठी 211 कोटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विदर्भासाठी महत्वाच्या असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या प्रस्तावित प्रकल्पांपैकी ९७६ प्रकल्पांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीसाठी २११.५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाल्याची माहिती, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली.

माजी मालगुजारी तलाव म्हणजे पुरातन काळच्या जमीनदारांनी लोकसहभागातून, सिंचनासाठी तयार केलेले तलाव होते. या तलावात पावसाचे पाणी साठविण्यात येत असे. या तलावांतून पावसाळ्यानंतर अनेक हेक्टर शेतीस पिकांसाठी पाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मंत्री राठोड यांनी नुकतीच बैठक घेतली होती.

विदर्भातील सुमारे ९,२८० माजी मालगुजारी तलावांपैकी सन २०२३-२४ मध्ये पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील ३४२ तलावांच्या दुरूस्तीसाठी ४४.०७ कोटी, भंडारा जिल्ह्यातील ७४ तलावांच्या दुरूस्तीसाठी २२.४१ कोटी, चंद्रपूर जिल्ह्यातील ४६० तलावांच्या दुरूस्तीसाठी १२०.३३ कोटी, व गडचिरोली जिल्ह्यातील १०० तलावांच्या दुरूस्तीसाठी २४.२४ कोटी असे एकूण २११.५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. राठोड यांनी मालगुजारी तलावांच्या कामाच्या प्रस्तावांबाबत आढावा घेऊन लवकर निधी मिळण्यास मान्यता मिळावी, यासाठी पाठपुरावा केला आहे. तलावांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीची कामे दर्जेदार होण्याकरिता संबंधित अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मंत्री राठोड यांनी दिल्या.