नांदुरा (Nandura) : बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला आणि शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताचा नांदुरा तालुक्यातील जिगाव प्रकल्पाला गती देण्यासाठी अतिरिक्त 1710 कोटीच्या निधीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
जिगाव प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत, तापी खोऱ्यातील पूर्णा उपखोऱ्यात आहे, हा प्रकल्प पूर्णा नदीवर बांधण्यात येत असून, या प्रकल्पाद्वारे बुलडाणा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 268 गावातील 79 हजार 840 हेक्टर व अकोला जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 19 गावातील 7 हजार 740 हेक्टर असे एकुण 87 हजार 580 हेक्टर क्षेत्र 15 उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, या प्रकल्पाला तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता 2019 मध्ये देण्यात आली होती.
आता पुन्हा अतिरिक्त 1710 कोटी रुपये खर्चाला मान्यता मिळाल्याने या प्रकल्पाला चांगलीच गती मिळणार आहे. खारपाणपट्ट्याच्या भागात सिंचनाची सुविधा होण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यात पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्पाचे काम सुरू आहे. 2024 पर्यंत अंशतः पाणीसाठा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. जिगाव प्रकल्पाच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोटयवधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे.