अमरावती (Amravati) : ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) योजना सुरू केली. मात्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी ही योजना दिवास्वप्न ठरत आहे. १२३ पैकी ४४ गावांमध्ये काम सुरू असल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गावांना ‘हर घर जल’साठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
२०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे किमान ५५ लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा करण्याचे जलजीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. तालुक्यात १२३ ग्रामपंचायती असून, ४४ गावांमध्ये योजनेचे काम सुरू आहे. त्यापैकी २० गावांना पाणी पोहोचल्याचे तसेच २४ गावांमध्ये ७० टक्के काम झाल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येते. जलजीवन योजनेअंतर्गत कोट्यवधींची कामे करण्यात आली. २०२१ व २०२२ मध्ये निविदा प्रक्रियाही पार पडली. त्यानंतर बहुतांश कामांना सुरुवातदेखील झाली. काही कामांची निविदा तयार होऊन कामांची संख्या वाढत गेली; मात्र अल्पावधीतच अनेक गावांतून कामांच्या तक्रारीदेखील वाढल्या. कंत्राटदारांकडून कामात दिरंगाई होत असल्याचा आरोपही झाला. काम पूर्ण होण्याचा अवधी २०२४ पर्यंत असला तरी एकही योजना पूर्ण झालेली नाही.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जलजीवन योजनेचे जाणीवपूर्वक तीन-तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचे असून, अनेक गावांमध्ये या योजनेची कामे अर्धवट परिस्थितीत पडलेली आहेत. जलजीवन मिशन ही योजना ग्रामीण भागातील गोरगरिबांसाठी व सर्वच नागरिकांसाठी अतिशय चांगली आहे. मात्र कंत्राटदाराच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे किंवा आर्थिक कमाईचे माध्यम समजून ही योजना नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येत आहे. अधिकारी -कर्मचारी वर्गसुद्धा पाहिजे त्याप्रमाणे कारवाई करताना दिसत नाही. बहुतांश ठिकाणी होत असलेल्या कामांच्या तक्रारीही संबंधित विभागाकडे करण्यात आल्या. त्यामुळे कामाचा दर्जा तपासण्याची मागणी होत असताना चौकशी करणार कोण व होणार कोणाची, हा गंभीर स्वरूपाचा प्रश्न जनतेला आहे. वरिष्ठ पातळीवर जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी किंवा चौकशी करून दर्जेदार कामे होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
योजनेचे काम प्रशासकीय यंत्रणेच्या वेळकाढू धोरणामुळे झाले नाही. त्यामुळे शेकडो गावे अजून तहानलेलीच आहेत. लवकरात लवकर कामे सुरू करण्याचे माझे प्रयत्न असून कामाचा दर्जा चांगल्याप्रकारे करण्यात येत आहे की नाही, याकडेही माझे लक्ष आहे.
- प्रताप अडसड, आमदार, धामणगावरेल्वे मतदारसंघ
काही दिवसांअगोदर तालुक्यात भूजल विभागाकडून पाणी सर्वेक्षण करण्यात आले. तालुक्यात पाण्याची पातळी खोल गेल्याचे भूजल सर्वेक्षणामध्ये सिद्ध झाले. त्या सर्व्हेक्षणानुसार येणाऱ्या काळात नांदगाव तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून लोकांना घरपोच पाणी गेले पाहिजे.
- श्याम शिंदे, जिल्हा सचिव, अखिल भारतीय किसान सभा
आमच्या विभागाकडे ४४ गावांचे प्रस्ताव आले असून २० गावांना पाणी पोहोचले आहे. त्यापैकी २४ गावांमध्ये ७० टक्क्यांपर्यंत कामे झाली असून उर्वरित कामे चालू आहेत.
- सुधा रहांगडाले, अभियंता, जलसंपदा विभाग, नांदगाव खंडेश्वर