Eknath Shinde
Eknath Shinde Tendernama
विदर्भ

मी मुंबईचा 'असा' कायापालट करणार की तुम्ही पाहात राहाल!

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आणि आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत दिली.

मुंबईच्या मालमत्ता करात वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील मुंबई महापालिका सुधारणा विधेयक सभागृहात मांडण्यात आले. त्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी मुंबईच्या विकासासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. मुंबई बदलत असून आता महानगरातील सर्व रस्त्यांचे सहा हजार कोटी रुपये खर्च करून काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. सोबतच मुंबईच्या सुशोभीकरणाला देखील सुरूवात झाली आहे. त्यामध्ये रस्ते, वाहतूक बेट, पदपथ, उड्डाणपूल यांचे सौंदर्यीकरण केले जात आहे, असे शिंदे म्हणाले.

मुंबईत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून, प्रत्येक वॉडमध्ये हा दवाखाना सुरू होणार आहे. त्याद्वारे उपचार आणि महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या देखील  मोफत करण्यात येणार आहेत. मुंबईत ५ हजार ५०० आशा स्वयंसेविकांची सेवा आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहर स्वच्छतेसाठी पाच हजार स्वच्छतादूतांची नियुक्ती केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जी २० परिषद बैठकीसाठी मुंबई सजली होती. त्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी केल्याचेही शिंदे म्हणाले.

दरम्यान, कोरोना काळात ठाकरे सरकारने बिल्डर ,बार, पब, हाॅटेल दारुवाल्यांना विविध करात तसेच शुल्कात जी सूट दिली होती त्याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी भाजप आमदार आशीष शेलार यांनी यावेळी केली.
कोरोना काळात ठाकरे सरकारने हाॅटेल ताजचा दंड माफ केला, बिल्डरांना प्रिमियममध्ये सुमारे १० हजार कोटींची  सूट दिली. तसेच हाॅटेल, पब, बार यांना परवाना शुल्लकात ५० टक्के सवलत दिली. तशीच सूट होर्डिंग्जवाल्यांना दिली. विदेशी दारुवरील कर ५० टक्के माफ केल्याचा आरोपही शेलार यांनी यावेळी म्हणाले.