Mahavitran
Mahavitran Tendernama
विदर्भ

महावितरणच्या भरतीत कंत्राटी कामगारांना सरकार देणार का प्राधान्य?

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : महावितरण कंपनीत लाईनमनची हजारो पदे मागील अनेक वर्षापासून रिक्त आहेत. या रिक्त पदांवर आयटीआयमध्ये वायरमन व इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये शिक्षण घेणारे अनेक उमेदवार कंत्राटी कामगार म्हणून मागील अनेक वर्षापासून काम करत आहेत. मात्र, त्यांना महावितरणच्या भरतीमध्ये प्राधान्य दिले जात नाही. या कामगारांना भरतीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांकडून केली जात आहे.

महावितरण कंपनीच्या भरतीमध्ये इयत्ता 10 वी आणि आयटीआयमध्ये वायरमन-इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये शिक्षण घेतलेल्या अधिक गुण प्राप्त उमेदवारांना विद्युत सहायक म्हणून नियुक्ती केली जाते. त्यांनी तीन वर्षे विद्युत सहायक म्हणून काम केल्यानंतर लाइनमनपदी स्थायी नेमले जाते. कंत्राटी कामगार सुद्धा आयटीआयमध्ये वायरमन व इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये शिक्षण घेतलेले आहेत. त्यांना वीज दुरुस्तीच्या कामाचा 5 ते 10 वर्षांचा अनुभव आहे. मात्र, शासनाने त्यांना महावितरणच्या भरतीत ना प्राधान्य दिले, ना त्यांना सेवेत स्थायी केले.

या कामगारांवर मोठ्या प्रमाणात 

अन्याय होत आहे. वीज कंत्राटी कामगारांना दरवर्षी 11 महिन्यांचे कंत्राट दिले जाते. त्यांना महिन्याला 15 हजार रुपये मानधन दिले जाते.

जीव धोक्यात घालून वीज सेवा देतात :

महावितरण कंपनी आपल्याला सेवेत स्थायी करेल, या आशेवर आहेत. आज ना उद्या न्याय मिळेल, याच्या प्रतीक्षेत आहेत. आपला जीव धोक्यात घालून कितीही कडक ऊन, थंडी, वादळवारा, पाऊस व कशाचीच पर्वा न करता रात्रंदिवस वीज प्रवाह निरंतर चालू ठेवण्यासाठी कामगार हे प्रयत्नशील राहून ग्राहकांना चांगली सेवा देतात. कोरोना काळातही या कामगारांनी उत्कृष्ट सेवा दिली होती. आता सुद्धा ते चांगली सेवा देत आहेत; परंतु सरकारकडून त्यांना महावितरणच्या भरतीत प्राधान्य दिले जात नाही, असा त्यांचा आरोप आहे.