Gondia
Gondia Tendernama
विदर्भ

Gondia : निधी उपलब्ध असूनही या तलावाचे का आहे काम बंद?

टेंडरनामा ब्युरो

गोंदिया (Gondia) : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पांढरी येथील मध्यभागी असलेल्या कान्होबा तलावासाठी निधी उपलब्ध असून, मागील 6 वर्षांपासून शाखा अभियंता व लघु पाटबंधारे विभागाच्या कामचुकार प्रणालीमुळे तलावाचा विकास लांबणीवर पडलेला आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असून, अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही. काम अर्धवटच दिसत आहे.

कान्होबा तलावाच्या निर्मितीपासूनच म्हणजे 25 वर्षांपासून स्थानिक प्रशासनाने तलावाच्या विकासाकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात कामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, 10 दिवसांतच तलाव खोलीकरणाचे सुरू असलेले काम बंद झाले. मोठ्या प्रमाणात तलाव खोलीकरणाची माती, तलावात जशीच्या तशी पडून आहे. शेवटी ही माती पावसाळ्यात पाण्याच्या तडाख्यात तलावात पसरून गेली; पण खोदलेल्या मातीला पावसाळ्यापूर्वी बाहेर काढण्याची वेळ ना स्थानिक प्रशासनाकडे ना लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याकडे आहे.

जर तलाव खोलीकरणाची माती बाहेर टाकली नाही, तर खोदकाम केले कशाला? असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंता व स्थानिक प्रशासनाचा हलगर्जीपणा व त्यांच्यात समन्वयाचा अभाव व रोजगार सेवकाचा सुस्तपणा या कामाला भोवल्याचे मजूरवर्गात बोलले जात आहे. दरवर्षी या तलावाचा लिलाव स्थानिक प्रशासन करतो. त्यातून मोठी रक्कम स्थानिक प्रशासनाला मिळते. तलाव दुरुस्ती अंतर्गत, तलावाचे मेन गेट नव्याने बनविण्याचे ठरले होते. पाणघाट, लिकेज दरुस्ती, सौंदर्यीकरण अशी विविध कामे यामध्ये असून मागील सहा वर्षांपासून नवीन गेट तर सोडा, नवीन गेटसाठी खोदलेली माती तलावातच सामावून गेलेली आहे त्याकारणाने तलावातील पाण्याचा लिकेज पूर्वीपेक्षाही आजघडीला जास्तच वाढलेला आहे.

10  दिवसांतच कामाला ब्रेक

2017-18 ची कामाची मंजुरी असून, चार वर्षांनंतर 2 एप्रिल 2021 रोजी कामाची सुरुवात करण्यात आले. मात्र, 10 दिवसांतच तलाव खोलीकरणाच्या कामाला जो ब्रेक लागला, तो आजपण कायम आहे. कामाचा बराच निधी आजपण शेष आहे. लघु पाटबंधारे विभाग दरवर्षी नवनवीन कामांचे भूमिपूजन करताना दिसतो; पण अर्धवट राहिलेल्या कामांचे काय? याही विषयावर चर्चा होत आहे.