ST Bus Samruddhi Mahamarg
ST Bus Samruddhi Mahamarg Tendernama
विदर्भ

'समृद्धी'वरून धावणार पहिली ST बस; नागपूर-शिर्डी भाडे तब्बल 1300रु.

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Negpur) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झालेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) एसटी महामंडळाने (MSRTC) सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पहिली बस नागपूर ते शिर्डी विनाथांबा बस गुरुवारपासून धावणार आहे. मात्र त्यासाठी १३०० रुपये भाडे मोजावे लागणार आहे. नियमित मार्गावरून शिर्डीला जाण्यासाठी यापूर्वी साडेपाचशे रुपये भाडे आकारले जात होते.

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या मार्गावर नागपूर ते शिर्डी बस चालविण्याचा निर्णय राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागाने घेतला आहे. गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरून रात्री ९ वाजता ही बस प्रस्थान करणार आहे. जलद विना थांबा असलेली बस दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता शिर्डीला पोहोचेल. तसेच शिर्डी वरून ही बस रात्री ९ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता ती नागपूरला पोहोचणार आहे.

या बसचे भाडे तेराशे (१३००) रुपये असणार आहे. तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास राहणार आहे. तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत राहणार आहे. ही बस विना वातानुकूलित असणार असून, नागपूर ते थेट शिर्डी विना थांबा असा प्रवास असणार आहे. प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी, तसेच आरामदायी सुखकर प्रवास व्हावा, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली असल्याचे विभागीय नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले.