Devendra Fadnavis, Vidarbha Tendernama
विदर्भ

Devendra Fadnavis: विदर्भात ऑटोमोबाईल उद्योगाची एन्ट्री! महिंद्राची 15 हजार कोटींची मेगा गुंतवणूक

नागपुरात पहिल्यांदा ऑटोमोबाईल उद्योगाकडून मोठी गुंतवणूक

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): विदर्भाच्या औद्योगिक विकासाला निर्णायक वळण देणारी घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपुरात केली. महिंद्रा अँड महिंद्रासोबत (M&M) झालेल्या १५ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे नागपुरात पहिल्यांदाच ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे. यासोबतच गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठा ग्रीन स्टील हब, नागपुरात सोलर मॉड्यूल उत्पादन, तर अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली असल्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी स्पष्ट केले.

नागपूर विद्यापीठ परिसरात आयोजित ‘खासदार औद्योगिक महोत्सव – ॲडव्हान्टेज विदर्भ २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी नागपुरात नेक्स्ट जनरेशन इलेक्ट्रिक वाहने आणि ट्रॅक्टरचे उत्पादन करणार असून, या प्रकल्पासाठी आवश्यक जागा निश्चित केली जाणार आहे. या गुंतवणुकीमुळे नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये पुण्यानंतरची देशातील मोठी ऑटोमोबाईल परिसंस्था उभी राहणार आहे. कंपनीने छत्रपती संभाजीनगर येथे सप्लाय हब, तर नाशिक येथे विस्तार केंद्र सुरू करण्याची घोषणाही केली आहे.

याशिवाय एन मोटिव्ह (जर्मनी) कंपनीसोबत १० हजार कोटींचा गीगा-कास्टिंग तंत्रज्ञानावर आधारित तीनचाकी इलेक्ट्रिक वाहनांचा करार करण्यात आला असून, पुढील टप्प्यात २,५०० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पातून ६ हजार थेट आणि १० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार असून, ८० टक्के उत्पादन निर्यातीसाठी असेल.

राज्यातील समतोल विकासासाठी मॅग्नेट औद्योगिक धोरण राबवले जात असून, नागपूर आणि अमरावती हे विदर्भातील प्रमुख मॅग्नेट म्हणून विकसित होत आहेत. नागपूर मॅग्नेटअंतर्गत गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांचा औद्योगिक विकास केला जात आहे. येथे ग्रीन स्टील हब आणि गॅस-आधारित ऊर्जा प्रकल्पांवर भर देण्यात येत आहे.

अमरावती मॅग्नेटमध्ये दुसरा टेक्सटाईल पार्क, विमानतळाचा विस्तार आणि आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारले जात असून, त्याचे उद्घाटन जुलैमध्ये होणार आहे. यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांचाही औद्योगिक विकास या माध्यमातून साधला जाणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढील ५ वर्षांत विदर्भात ५ लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य जाहीर करत, गडचिरोलीत आतापर्यंत ७.५ लाख कोटींची गुंतवणूक आल्याचे नमूद केले.

एकूणच, ऑटोमोबाईल, ग्रीन स्टील, सौर ऊर्जा, एव्हिएशन ट्रेनिंग आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांमुळे विदर्भाचा औद्योगिक चेहरा झपाट्याने बदलत असून, हा भाग राज्याच्या विकासाचे नवे इंजिन ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले.