Scam
Scam Tendernama
विदर्भ

250 कोटींचा कंत्राट मिळवून देण्याच्या नावावर लावला 66 लाखांचा चुना

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : रस्त्याचे काम घेणाऱ्या एका कंत्राटदाराला त्याच्याच कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्याने चक्क 66 लाखांनी फसविले. कंत्राटदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना सदर पोलिस हद्दीत उघडकीस आली. अरविंद डकाह (47) रा. गड्डीगोदाम असे पीडित सिविल कंत्राटदाराचे नाव आहे.

अरविंद यांचे पोकलेन, बुलडोझर लावून जमीन सपाट करून देण्याचे मुख्य काम आहे. काही वर्षापूर्वी त्यांनी एका खासगी कंपनीचे काम घेतले. आरोपी अजय सिंह ओंकार सिंह (48) रा. खरे टाऊन हा त्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहात होता. अजयची बोलण्याची पद्धत आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेने अरविंदही प्रभावित झाले. दरम्यान अजयने त्या कंपनीतून काम सोडले आणि अरविंदकडे व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागला. 2013 पासून काम सुरू केले आणि अवघ्या काही दिवसातच त्याने अरविंद यांचा विश्वास संपादन केला.

कामात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून अरविंदने स्वतःची मेल आइडी त्याला दिली. आरोपी अजय हा त्यांच्या मेल साईटवरच काम करायचा. विशेष म्हणजे तांत्रिक कामाचे ओटीपी आरोपीलाच मिळत होते. राजकीय क्षेत्रात ओळख असल्याची थाप मारून अजयने अडीचशे कोटींचे रस्ते बांधकामाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. अरविंदही त्याच्या आमिषाला बळी पडले. त्यांनी स्वतःच्या बँक खात्यातून रक्कम आरोपीच्या खात्यात वळती केली. एकूण 66 लाख 20 हजारांची रक्कम घेतल्यानंतरही कंत्राट मिळाले नाही. अजय हा 2019 मध्ये विदेशात निघून गेला. आपली फसवणूक झाल्याची खात्री अरविंदला पटली. त्यांनी शहर गुन्हे शाखेत धाव घेतली. चौकशीनंतर सदर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला.

पैसे घेतले पण ठेका मिळाला नाही

लाखो रुपये देऊनही अजयने आतापर्यंत अरविंदला ठेका दिलेला नाही. या घटनेत त्याने बडतर्फ करून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. हे लक्षात येताच अरविंदने अजयला पैसे परत करण्यास सांगितले, त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. तपासात फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाखो रुपयांच्या व्यवहारामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेकडे सोपवण्यात आला आहे.