Ajit Pawar
Ajit Pawar Tendernama
विदर्भ

शिंदे साहेब, हे महाराष्ट्र सरकारला शोभतं का? स्थगितीचं कारण काय?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Mumbai) : महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आल्याने विरोधकांनी आज शिंदे सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले.

विधानसभेत कामकाजाला सुरवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, राज्यात सत्तांतर होऊन सहा महिने झाली आहेत. यापूर्वीच्या सरकारने अर्थसंकल्पात जी विकासकामे मंजूर केली होती ती सर्व व्हाइट बूकमध्ये आली होती. परंतु तरीही त्याला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. आतापर्यंत राज्यात अनेक सरकारे बदलली आहेत. परंतु व्हाइट बूकमध्ये आलेल्या विकासकामांना कधीही स्थगिती देण्यात आलेली नाही; ही विकासकामे गुजरात किंवा तेलंगणातली नाहीत, महाराष्ट्रातली आहेत. तरीही सरकारने त्याला स्थगिती कशी काय दिली, असा सवाल करत अजित पवारांनी सरकारला जाब विचारला.

अजित पवारांनी केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्यूत्तर दिले. ते म्हणाले की, ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात मविआचे सरकार स्थापन झाले त्यावेळी त्यापूर्वीच्या सरकारने मंजूर केलेली विकासकामे रोखण्यात आली होती. माझ्या नागपूर विधानसभा मतदारसंघातल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. मविआचे सरकार असताना भाजपच्या आमदारांना एक नवा पैसा विकासकामांसाठी दिला नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

राज्य सरकार सूडभावनेने काम करत नसून, ७० टक्के विकासकामांची स्थगिती रद्द करण्यात आली आहे. निधीवाटप करताना कोणताही नियम पाळण्यात आलेला नव्हता, त्यामुळे आम्ही स्थगिती दिल्याचेही स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले. मागील सरकारने जिथे दोन हजार कोटींची तरतूद होती, तिथे हजारो कोटी वाटप केले, हे पैसे आणणार कुठून, असा सवालही त्यांनी केला. याशिवाय तुम्ही सात-सात वेळा निवडून आलेला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. परंतु काही गोष्टी आम्ही तुमच्याकडूनच शिकल्याचे सांगत फडणवीस यांनी अजित पवार आणि बाळासाहेब थोरातांना टोला हाणला.

त्याआधी विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तरे सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे संतप्त विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनापुढे घोषणाबाजी सुरू केली. 'शिंदे सरकार, खोके सरकार... हाय हाय', 'नही चलेगी, नही चलेगी; तानाशाही नही चलेगी' अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. प्रश्नोत्तरे सुरू असताना विधानसभा अध्यक्षांनी विरोधी आमदारांना बसण्याची विनंती केली. परंतु आमदारांच्या घोषणा सुरू असल्याने अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. त्यानंतर अध्यक्ष येताच घोषणबाजी सुरू झाली, त्यामुळे पुन्हा पंधरा मिनिटे व नंतर आणखी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. शेवटी या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर या गोंधळावर पडदा पडला.