Bhandara
Bhandara Tnedernama
विदर्भ

Bhandara : 'या' धोकादायक बनलेल्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : पालांदूर लाखनी तालुक्यातील जेवणाळा ते पालांदूर 3.770 किमीचा रस्ता अखेरच्या घटका मोजून नव्या रुपात प्रवाशांना दिसत आहे. येत्या दहा दिवसांत त्यावर यांत्रिक मशीनने डांबरीकरणाचा कोट मिळणार आहे. तत्पूर्वीची रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. जैतपूर, मन्हेगाव, पालांदूर ते मानेगाव या रस्त्याला राज्यमार्ग म्हणून मान्यता मिळाली आहे. राज्यमार्ग दर्जा मिळाल्याने रस्त्याची दुरवस्था दूर होण्यासाठी मोठी मदत झाली हे विशेष.

मानेगाव ते पालांदूर या 18 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण बांधकाम विभागाने कोरोना काळापूर्वीच मंजूर केले होते. मात्र ते काम गोंडेगाव पर्यंतच पार पडले. ते एका नामांकित मोठ्या बांधकाम कंपनीने पूर्ण केले. मात्र त्यानंतर गुरढा ते जेवणाळा व जेवणाळा ते पालांदूर हा रस्ता डांबरीकरणाविना खाचखड्यांमुळे प्रवाशांना अपघाताला आमंत्रण देत होता.

पालांदूर ते गुरढा रस्त्यावर पावसाळ्याच्या दिवसात अनेक अपघात जेवणाळा कवडशी टोली हा अपघात प्रवणस्थळ म्हणून धोकादायक अवस्थेत नावारूपास आला होता. लोकप्रतिनिधींनी बांधकाम विभागाकडे बांधकामाची वारंवार मागणी केली, मात्र निधीची व कोरोना संकटाची समस्या तीव्र झाल्याने रस्त्याला निधीचा वाणवा होता.

रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आल्याने उपविभागीय बांधकाम अधिकारी मटाले साकोली यांनी रस्त्याच्या बांधकामासाठी नियमितपणे प्रयत्न करीत रस्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. वर्षभरापूर्वीपासून रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हा रस्ता राज्यमार्ग सुद्धा घोषित झालेला आहे.

चुलबंद नदीवरील 16 कोटींचा पूल प्रगतिपथावर

लाखांदूर व लाखनी तालुक्याला जोडणारा चुलबंद नदीवरील 26 कोटी रुपयाचा पूल येत्या महिन्याभरात पूर्णत्वाला जात आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी रहदारीसाठी मिळणार आहे. पुलाचे दोन्ही रस्ते मजबुतीकरणासह तयार होत आहेत. या पुलामुळे चुलबंद खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी सुलभता मिळणार आहे.

जेवणाळा ते पालांदूर 3.770 किमी रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण आटोपले आहे. 31 मार्चपर्यंत डांबरीकरण पूर्ण करण्याचा बेत आहे, अशी प्रतिक्रिया साकोली बांधकाम विभागाचे अभियंता कृष्णा लुटे यांनी दिली.