Bhandara
Bhandara Tendernama
विदर्भ

Bhandara : का रखडले जेवणाळा-पालांदूर रस्त्याचे डांबरीकरण?

टेंडरनामा ब्युरो

भंडारा (Bhandara) : जेवणाळा ते पालांदूर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. डांबरीकरणापूर्वीचे संपूर्ण काम आटोपलेले असताना डांबरीकरण मात्र थांबले आहे. पालांदूर इथून तालुक्यापर्यंत जाण्याकरिता हाच एकमेव मार्ग असल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिक असल्याने तत्परतेने रस्ता डांबरीकरणाचा होणे गरजेचे आहे. मात्र सरकार, प्रशासन स्तरावरून निधी उपलब्ध न झाल्याने रस्त्याचे डांबरीकरणाचे काम रखडले आहे.

पालांदूर ते मानेगाव व पालांदूर ते जैतपूर हा राज्यमार्ग घोषित झाला आहे. राज्यमार्ग घोषित झाल्याने रस्त्याच्या निधीला मोठी मदत झाली. रस्ता तत्परतेने प्रवाशांच्या सेवेत वेळेत मिळावा याकरिता उपविभागीय बांधकाम अभियंता दीनदयाल मटाले, अभियंता कृष्णा लुटे यांनी प्रयत्न केले. मात्र अंतिम टप्प्यात काम आला असताना निधीची कमतरता आल्याने कंत्राटदाराने पुढचे डांबरीकरणाचे काम थांबविले आहे.

जैतपूर पालांदूर मानेगाव रस्त्याचे काम प्रगतीपथावर असले तरी मरहेगाव ते पालांदूर व पालांदूर ते जेवणाला रस्त्याचे डांबरीकरण रखडले आहे. हा रस्ता लाखनी व लाखांदूर तालुक्याला जोडणारा आहे. त्यामुळे या रस्त्यावर रहदारी मोठी असून पावसाळ्यापूर्वी रस्ता व चुलबंद नदीवरील पूल प्रवाशांना मिळणे गरजेचे आहे. त्या दिशेने बांधकाम विभाग साकोली यांनी नियोजन करण्याची मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

जेवणाळा ते पालांदूर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नियोजित निधी थकल्याने थांबले आहे. निधीची व्यवस्था होताच डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू केले जाईल, अशी माहिती कंत्राटदार जीतू जेठाणी यांनी दिली.

चुलबंद नदीवरील पूल अंतिम टप्प्यात : 

मन्हेगाव ते जैतपूर मार्गावरील चुलबंद नदीवरील 16 कोटी रुपये किमतीच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचलेले आहे. मात्र अद्याप काही काम शिल्लक आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते व इतर कामे पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.