Futala Fountain
Futala Fountain  Tendernama
विदर्भ

फडणवीस-गडकरींच्या नागपुरात कंत्राटदाराची मनमानी; काय आहे प्रकरण...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) ः खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे सध्या फुटाळा (Futala Talav) येथे संगीत कारंज्यांचा ट्रायल शो सुरू असून, नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. परंतु खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीने ट्रायल शो आयोजित करण्यापूर्वी प्रकल्पाचे काम करणाऱ्या स्टुडिओ वन खळदकर कंस्ट्रक्शन कन्सोरशियम कंपनीच्या संचालकाने परवानगी न घेता परस्पर पत्रिका छापून ट्रायल शोचे आयोजन केले. याप्रकरणी नासुप्र विश्वस्त मंडळाच्या बैठकीत कंत्राटदार कंपनीच्या संचालकावर संताप व्यक्त करण्यात आला असून, त्याला नासुप्रने नोटीस बजावली.

फुटाळा येथील संगीतमय कारंजे ट्रायल शो सध्या चांगलाच गाजत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या अद्वितीय प्रकल्पाला नुकताच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट देऊन कौतुक केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीने १६ सप्टेंबरपासून संगीत कारंज्यांचा ट्रायल शो आयोजित करून नागपूरकरांना मनोरंजनाची मेजवानी दिली. परंतु त्यापूर्वी १५ सप्टेंबरला या प्रकल्पाचे काम करणाऱ्या स्टुडिओ वन खळदकर कंस्ट्रक्शन कन्सोरशियम कंपनीच्या संचालकाने परस्पर ट्रायल शोचे आयोजन केले. कंत्राटदार कंपनीने नासुप्रलाही याबाबत कळविले नाही. विशेष म्हणजे या ट्रायल शोसाठी कंत्राटदार कंपनीने परस्पर पत्रिका छापून वितरित केल्या.

यावर नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आज विश्वस्त आमदार विकास ठाकरे, संदीप इटकेलवार यांनी संताप व्यक्त करीत कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना केली. स्टुडिओ वन खळदकर कंस्ट्रक्शन कन्सोरशियम कंपनीला नोटीस देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कंपनीच्या खुलाशावर पुढील बैठकीत कारवाई करण्यात येईल, असेही ठरविण्यात आले.

पत्रिकेतून मुख्यमंत्र्यांचे नाव गायब
छापलेल्या पत्रिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील आमदारांचीही नावे टाकण्याचे सौजन्यही कंत्राटदाराने दाखविले नाही. एवढेच नव्हे संगीत कारंजेचा प्रकल्प स्वतःचा असल्याचेही पत्रिकेतून भासविले. त्यामुळे नासुप्र विश्वस्तांनी कंत्राटदार कंपनीवर तीव्र संताप व्यक्त केला.