Tender Scam Tendernama
विदर्भ

Amravati : टेंडर न काढता जुन्याच कंत्राटदाराला काम! कोणी केली चौकशीची मागणी?

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : अमरावती येथील बाजार समितीमध्ये करण्यात आलेले ४४ लाख रुपयांचे विद्युतीकरणाच्या कामात गैरप्रकार झाल्याचा अहवाल चौकशी अधिकारी यांनी दिला असल्याचा दावा शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. मात्र यावरून जिल्हा उपनिबंधकांनी संबंधितांविरुद्ध कारवाईचे आदेश काढले नसल्याने आक्षेप घेतला आहे.

यासोबतच साफसफाईच्या कंत्राटाचे टेंडर न काढता वाढीव रकमेत जुन्याच कंत्राटदारास दिल्याचाही आरोप केला असून बाजार समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश साबळे व सचिव शेखर औगड यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल केलेल्या तक्रारीत चैाकशी अधिकाऱ्याने बाजार समितीत आर्थिक गैरप्रकार घडला असल्यावर शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले आहे.

स्थानिक बाजार समितीला विद्युत कामाकरिता ४४ लाख ३४ हजार ७९१ रुपयांच्या कामास जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासकीय मंजुरी दिली होती. तथापि बाजार समिती प्रशासनाने या कामांसाठी ई-टेंडर प्रक्रिया न करता आप्तजनांना कामे दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीची चैाकशी करण्यात आली असून चौकशी अधिकाऱ्यांनी सभापती, उपसभापतींसह संचालक सचिव, बांधकाम उपसमिती प्रमुख, अभियंता व ओव्हसियर यांच्यावर ठपका ठेवल्याचे म्हटले आहे. यावरून जिल्हा उपनिबंधकांनी दोषी ठरविण्यात आलेल्यांविरुद्ध कारवाई करणे अपेक्षित असताना ती न करता त्यांना अभय दिल्याचे म्हटले आहे.

यासोबतच बाजार समितीमधील साफसफाईच्या कंत्राटाची टेंडर प्रक्रिया न राबविता जुन्या कंत्राटदारास मागील कंत्राटाच्या रकमेपेक्षा २५ टक्के वाढीव दराने कंत्राट दिल्याने बाजार समितीचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आक्षेप नोंदविला आहे. दोन्ही प्रकरणांत कारवाई करण्याची मागणी प्रकाश साबळे व शेखर औगड यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

बाजार समितीमधील सर्व कामे नियमानुसारच झाली आहेत. सध्या आमच्याविरुद्ध तक्रारींचा पाऊस आहे. ३० पेक्षा अधिक तक्रारी आहेत. सर्व कामे नियम पाळूनच केली गेली, हे सिद्ध करू. तक्रारकर्त्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे ते तक्रारी करीत आहेत. बाजार समितीला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे.

- हरीश मोरे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती