Amravati ZP
Amravati ZP Tendernama
विदर्भ

Amravati : अमरावती जिल्ह्याने मारली बाजी; निधी खर्चात राज्यात पाचव्या स्थानी

टेंडरनामा ब्युरो

अमरावती (Amravati) : अमरावती जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध विकासकामांसाठी राज्य सरकारकडून 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला सुमारे 395 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. हा निधी जिल्हा नियोजन समिती विभागाला मिळाला असून, आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे 37 दिवस शिल्लक असताना आतापर्यंत 350 कोटी रुपयांचा खर्च विकासकामांवर खर्च करण्यात आल्याचे जिल्हा नियोजन विभागाकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे निधी खर्चात राज्यात पाचव्या क्रमांकावर असून, विभागात अमरावती जिल्हा पहिला आहे. मार्च एंडिंग जवळ येत असताना प्रशासनासमोर 45 कोटी रुपये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच खर्च करण्याचे आव्हान आहे.

जिल्ह्यात विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेकरिता निधी प्रस्तावित करण्यात येतो. त्यामध्ये सर्वसाधारण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती योजना व उपयोजनांचा समावेश असतो. या निधीचे शासकीय यंत्रणांना वितरण, नियोजन समितीचे प्रमुख म्हणून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) करण्यात येते, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी शासकीय योजनांना निधीची तरतूद करण्यासाठी नियोजन विभागाने शासकीय यंत्रणांकडून प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार आर्थिक वर्ष 2023-24 साठी शासनाने 395 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून हा 395 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

या निधीपैकी 350 कोटी रुपये विविध यंत्रणांना वितरित करून हा निधी खर्च करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अल्प कालावधी आहे. या कालावधीत 45 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यास असलेला कालावधी लक्षात घेता येत्या दीड ते दोन आठवड्यांत 45 कोटी रुपयांच्या निधी खर्चाचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

जिल्हा नियोजन समितीने 2023-24 या आर्थिक विकास कामांचा सुमारे 305 कोटीचा आराखडा मंजूर केला होता. यापैकी आतापर्यंत 350 कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित 45 कोटी रुपये आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी खर्च होतील. विशेष म्हणजे निधी खर्चात जिल्हा विभागात पहिला, तर राज्यात पाचवा आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित म्हस्के यांनी दिली.

विभागात जिल्हा पहिल्या क्रमांकावर :

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झालेल्या निधीचा आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीचे विनियोग करण्यात अमरावती जिल्ह्याने राज्यात पाचवा, तर विभागात पहिला क्रमांक घेतला आहे. राज्यात पुणे जिल्ह्याने प्रथम, नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्याने दुसरा, गडचिरोली जिल्ह्याने तिसरा व चौथा क्रमांक छत्रपती संभाजीनगर आणि पाचव्या क्रमाकांवर, तर विभागात पहिल्या क्रमांकावर अमरावती जिल्हा आहे.