MIHAN Tendernama
विदर्भ

मोठ्या कंपन्यांचा दुष्काळ असलेल्या मिहानमध्ये पिस्तुलांचा कारखाना

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : जागतिक मंदी आणि कोरोनामुळे अनेक वर्षांपासून ओसाड पडलेल्या मिहान (Mihan) प्रकल्पासाठी एक आनंदराची बातमी आहे. मुंबई (Mumbai) येथील एका शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कंपनीने येथे ७० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे डिफेंस क्षेत्राला मिहानमधून बूस्टर मिळण्याची शक्यता आहे.

मिहान प्रकल्पाची स्थापना केली तेव्हा मोठमोठे दावे करण्यात आले होते. कोट्यवधीची गुंतवणूक होईल, हजारो रोजगार उपलब्ध होतील, विदर्भात औद्योगिक क्रांती होईल, असे सांगण्यात येत होते. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मिहान प्रकल्प आम्हीच आणला अशी स्पर्धा लागली होती. मोठमोठे प्रझेंटेशन देऊन याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात होता. मागील दोन लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मिहान हासुद्धा प्रचाराचा एक महत्त्वाचा मुद्दा होता.

पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना विदर्भातील गुंतवणुकीसाठी ॲडव्हांटेज विदर्भ कार्यक्रम घेण्यात आला होता. कागदोपत्री कोट्यवधींचे करार झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले. ते नागपूरचे असल्याने मिहानला बुस्टर मिळेल असे वाटत होते. अंबानी यांचा विमानांच्या सुट्या भागांच्या निर्मितीच्या एका प्रकल्पाची येथे घोषणा झाली होती. स्वतः अनिल अंबानी नागपूरला येऊन गेले होते. रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीनेने सुद्धा जागा मागून प्रकल्प घोषित केला होता. यापैकी एकही कंपनी येथे सुरू झालेली नाही. त्यामुळे मिहान प्रकल्प आता महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या प्रचाराच्या मुद्द्यातून बाद झाला आहे. काही छोट्या मोठ्या कंपन्या येथे सुरू आहेत. त्यातही आयटी कंपन्यांची संख्या अधिक आहे. हे बघता इतर औद्योगिक परिसराप्रमाणेच मिहानची अवस्थ झाली आहे.

फडणवीस आणि गडकरी यांनी नागपूरध्ये लॉ युनिर्व्हसिटी, ट्रीपल आयटी, आयआयएम या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था आणल्या आहेत. मात्र येथील विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी लागणाऱ्या कंपन्या अद्याप येथे स्थापन करता आलेल्या नाहीत. त्यामुळे वैदर्भीयांना आता मिहानचा विसर पडला आहे. यात मुंबईच्या जय अर्नोमेंट कंपनीने येथे ७० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे शस्त्रांकरिता लागणारे चेंबर, कॅलिबर, रायफलींना लागणाऱ्या सुट्या भागाची निर्मिती केली जाणार आहे. या कंपनीमुळे काही अभियंत्यांसह २०० लोकांना रोजगार मिळेल असे सांगण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती बघता हे ही नसे थोडके... असेच म्हणावे लागले.