Surgical Complex
Surgical Complex Tendernama
विदर्भ

'मेयो'तील सर्जिकल कॉम्प्लेक्स बनले गोदाम; 77 कोटी पाण्यात...

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) ७७ कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या सर्जिकल कॉम्प्लेक्सला (Surgical Complex) प्रशासनाने गोदाम केले आहे. त्यामुळे हा पैसा वाया गेला आहे.

मेयोतील सर्जिकल कॉम्प्लेक्‍समध्ये सर्जरी विभागाचे मुख्य ऑपरेशन थिएटर आणि अतिदक्षता विभाग रुग्णसेवेत आहेत. याशिवाय पहिल्या माळ्यावर अस्थिरोग विभागासाठी तीन मॉड्युलर ओटी, प्रत्येकी ३० खाटांच्या क्षमतांचे अनेक वॉर्ड रुग्णसेवेसाठी आहेत. दुसऱ्या माळ्यावर नेत्रविभागाचे तीन अत्याधुनिक शल्यक्रिया, गृहे, कान-नाक-घसा विभागाचा वॉर्ड तयार करण्यात आला. तिसऱ्या माळ्यावर कान-नाक-घसा विभागासाठी एक अत्याधुनिक शल्यक्रिया गृह आणि सर्जरी विभागासाठी दोन आंतररुग्ण वॉर्ड तयार केले आहेत.

जळित वॉर्डातील खाटांसह ३९० खाटांच्या या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये विविध वॉर्डांत दाखल रुग्णांना तत्काळ कृत्रिम श्वासोच्छवास प्रणाली उपलब्ध व्हावी यासाठी सेंट्रलाइज्ड लिक्विड ऑक्सिजन युनिट स्वतंत्रपणे मंजूर करण्यात आले आहे. तर ऑक्सिजन लिकेज शोधणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. या कॉम्प्लेक्सच्या सौंदर्याला नजर लागली आहे. कोरोना काळात येथे मोठ्या प्रमाणात मागवण्यात आलेल्या शवपेटी टाकून दिल्या आहेत. याशिवाय ‘यूपीएस’ शवपेट्या उन, वारा, पावसाचा मारा झेलत पडून आहेत. हे साहित्य येथे पडून असल्याने सर्जिकल कॉम्प्लेक्सचे सौंदर्यच हरवले आहे.

एका छत्राखाली सर्व उपचार व्हावेत या उद्देशाने ७७ कोटी रुपये खर्चून सर्जिकल कॉम्प्लेक्‍स झाले. मात्र प्रशासनाकडून त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा चेहरा विद्रूप झाला आहे.