Kumbh Mela
Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: सिंहस्थमेळा; साधुग्रामसाठी 300 एकर भूसंपादनाचा अहवाल पाठवा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ मध्ये होत असून कुंभमेळापूर्व कामांच्या नियोजनासाठी शासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंहस्थ नियोजनात सर्वात महत्वाचा घटक असलेल्या साधुग्रामसाठी ३०० एकर जमीन भूसंपादन करण्यासाठी नगरविकास विभागाने नगर रचना विभागाकडून अहवाल मागवला आहे. साधुग्रामसाठी महापालिकेने २६४ एकर जागेवर आरक्षण टाकलेले आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा दर बारा वर्षांनी होत असल्याने त्यानिमित्ताने नाशिक शहर व जिल्ह्यात अनेक पायाभूत सुविधा उभारल्या जातात. सिंहस्थ काळात देशभरातून येणाऱ्या साधू महंतांसाठी तपोवनात साधुग्राम उभारले जाते. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे तपोवन परिसरात साधूग्रामसाठी जागा अपुरी पडत असल्याने साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करण्याचा प्रस्ताव समोर आला होता. त्यासाठी तपोवन परिसरातील जमिनींचे भूसंपादन करण्याबाबत चर्चा झाल्या होत्या. त्याचप्रमाणे साधुग्रामसाठी तात्पुरत्या स्वरुपात जमिनी भाड्याने न घेता त्यांचे कायमस्वरूपी भूसंपादन करण्यास शेतकऱ्यांचीही संमती आहे. मात्र, भूसंपदनाच्या बदल्यात महापालिकेने वाढीव टीडीआर देण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केला. यामुळे साधुग्रामसाठी जमीन।मिळवण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. 

सद्यस्थितीत साधुग्रामसाठी तपोवनात महापालिकेचे २६४ एकर जागेवर आरक्षण असून, त्यापैकी ५४ एकर जागा संपादित केली आहे. आता सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केवळ चार वर्षे उरली असल्याने उर्वरीत जागेच्या भूसंपादनासाठी सरकार पातळीवरून हालचाल सुरू झाली आहे. यापूर्वी महापालिकेने सरकारला सिंहस्थ आराखडाबाबत अहवाल पाठवला होता. त्यानंतर तीन महिन्यांनी महापालिकेला शासनाच्या नगरविकास खात्याचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार साधुग्रामच्या भूसंपादनासाठी नगररचना संचालक, सहायक संचालक, सहसंचालकांकडून तीनशे एकर जागेच्या भूसंपदानाबाबत स्वयंस्पष्ट अहवाल मागवण्यात आला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तीनशे एकर जागेची गरज आहे. त्यासाठी नव्याने प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

असे आहे आरक्षण

- सद्यस्थितीत तपोवनातील तब्बल २६४ एकर जागेवर साधुग्रामचे आरक्षण

- १७ एकर जागा पार्किंग व अग्निशमन दलासाठी आरक्षित

- सद्यस्थितीत ५४ एकर जागा महापालिकेकडून संपादित

- साडेतेरा एकर जागेच्या संपादनाची प्रक्रिया सुरू