Ring Road
Ring Road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

1026 कोटींचा सिन्नर-शिर्डी चौपदरी मार्ग अंतिम टप्प्यात

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सिन्नर-शिर्डी (Sinnar-Shirdi) या मार्गाचे १०२६ कोटी रुपयांच्या निधीतून चौपदरीकरणाचे काम सुरू असून, ते काम जवळपास ८५ टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे या मार्गावरील टोलनाका जानेवारीअखेरीस सुरू होणार असून या रस्त्याचे काम मार्च अखेरीस पूर्ण होणार आहे. यामुळे सिन्नर ते शिर्डी या भागात होणाऱ्या मोठ्याप्रमाणावरील अपघातांना आळा बसून प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकणार आहे. तसेच मुंबई, नाशिक, गुजरात येथून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना आता सिन्नर शहरातून जाण्याची गरज पडणार नाही.

नाशिकहुन सिन्नरमार्गे शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना सिन्नर शहरातून जाताना वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करावा लागतो. तसेच सिन्नरच्या पुढे एकेरी मार्ग असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांना अपघात होण्याचे प्रमाणही मोठे आहे. नाशिक पुणे महामार्गावर सिन्नरच्या बाह्यवळण रस्त्याने सिन्नर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काही प्रमाणात कमी झाला असला, तरी सिन्नर शिर्डी मार्गावरील अपघातांच्या संख्येत काहीही घट आलेली नाही. यामुळे सिन्नर-शिर्डी हा चौपदरी रस्ता प्रस्तावित करण्यात आला. या मार्गासाठी १०२६ कोटी रुपयांचा निधी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने मंजूर केले. तसेच नाशिक पुणे महामार्गावरून गुरेवाडी फाटा येथून मुसळगावला शिर्डी मार्गाला जोडण्यात आले. यासाठी गुरेवाडी फाटा येथे वाय आकाराचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

या चौपदरी महामार्गामुळे मुंबई, गुजरात येऊन शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना सिन्नर शहरातून जाण्याची कटकट मिटली असून सिन्नरच्या बाह्यवळण रस्त्याने ते थेट शिर्डी मार्गाला जोडले जाणार आहेत. या चौपदरीकरण केलेल्या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे या ५० किलोमीटरच्या मार्गावर सात मीटरचे पालखी मार्ग उभारण्यात आले आहेत. या मार्गामुळे पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे. हा मार्ग हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून तयार करण्यात आला असून सिन्नरच्या पुढे २८ किलोमीटरवर पिंपरवाडी येथे टोलनाका उभारण्यात आला आहे. पालखी मार्ग व रस्त्याचे ८५ टक्के काम झाले असल्याने जानेवारी अखेरीस टोलनाका सुरू होणार असून मार्च अखेरीस संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. या रस्त्यावरील गावांमधील रहिवाशांच्या सोईसाठी स्कायब्रिज, बोगदे करण्यात आले असून साईभक्तांसाठी दोन भक्तनिवासही बांधण्यात येत आहेत. या मार्गावर गुरेवाडी, वावी, पांगरी येथे उड्डाणपूल उभारण्यात येतआहे. त्याच प्रमाणे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे काम सुरू आहे.