नाशिक (Nashik): नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ या बोधचिन्ह स्पर्धेस देशासह जागतिक पातळीवरून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून, एकूण ३ हजार ६७ जणांनी सहभाग घेतला आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी ही माहिती दिली. कुंभमेळा प्राधिकरणामार्फत बोधचिन्ह (लोगो डिझाईन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी 20 डिसेंबर, 2025 पर्यंत प्रवेशिका सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी बोधचिन्ह तयार करताना नागरिकांचा सहभाग असावा या हेतूने ही बोधचिन्ह स्पर्धा आयोजित केली आहे. यात प्रथम क्रमांक येणाऱ्या स्पर्धकाला तीन लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी याबाबत १४ नोव्हेंबरच्या भूमिपूजन कार्यक्रमात घोषणा केली होती. त्यानुसार या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या प्राप्त प्रवेशिकांपैकी महाराष्ट्रातून एक हजार ५५ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील ७९ प्रवेशिकांचा समावेश आहेत. तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह इतर राज्यांमधून १ हजार ९४२ आणि परदेशातून ७९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.
देशातील २५ पेक्षा अधिक राज्यांमधून स्पर्धकांनी बोधचिन्ह तयार करून पाठवले आहे. विशेष म्हणजे १८ते २४ या वयोगटातील जेन झी तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. या स्पर्धेसाठी प्राप्त बोधचिन्हांची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर पद्धतीने राबविण्यात येणार असून निवड प्रक्रियेसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांची निवड समिती नेमण्यात येणार आहे.
या समितीमध्ये वास्तुकला, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक अभ्यासक यासह दृश्य व ललित कला क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असणार आहे. पॅनलच्या माध्यमातून प्राप्त प्रवेशिकांची बहुस्तरीय व सखोल छाननी करण्यात येणार असून जानेवारी २०२६ अखेर या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.
दर बारा वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक आहे. सिंहस्थ कुंभमेळासाठी निवड करण्यात येणारे बोधचिन्ह हे सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक साराचे आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरणार आहे. ते जागतिक पातळीवर तसेच सर्व व्यासपीठांवर श्रद्धा, उत्सव आणि कालातीत परंपरा व्यक्त करेल.
या स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद हा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ विषयी जनमानसातील उत्सुकता, भावनिक नाते आणि सर्जनशील उत्साहाचे द्योतक असल्याची भावना सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.