मुंबई (Mumbai) : राज्यातील पहिल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नवीन प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हा मार्ग 235 किलोमीटरचा असून त्यावर 20 रेल्वे स्टेशन्स उभारले जाणार आहेत. काम सुरु झाल्यापासून ५ वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा महारेलचा प्रयत्न आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक हा तब्बल साडे पाच तासांचा प्रवास सुमारे दोन तासात पूर्ण होणार आहे.
या नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे पुणे, नाशिकसह नगर जिल्ह्याला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या पुणे नाशिक प्रवासासाठी रस्तामार्गाने प्रवासाचा पर्याय आहे. नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे या मार्गावर रेल्वेची कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे पुणे नाशिक हे सुमारे 249 किलोमीटर अंतर अवघ्या सुमारे दोन तासांत पार करता येणार आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी या प्रकल्पासांदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नवीन तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होईल.
महारेलच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या डीपीआरमध्ये नारायणगाव येथील 'जीएमआरटी'चा सुरक्षा संवेदनशील प्रकल्प तसेच नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे संचालित जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (रेडिओ टेलिस्कोप) वापरण्याचा रेल्वेला प्रस्ताव होता. मात्र, ही बाब रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात येताच नवीन आराखडा (डीपीआर) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग हा 235 किलोमीटरचा असणार आहे. या मार्गावर नाशिक-पुणे दरम्यान 20 रेल्वे स्टेशन उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 102 पैकी 85 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातून 25 हजार रोजगार निर्माण होतील असा अंदाज आहे. काम सुरु झाल्यापासून पाच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचा महारेलचा मानस आहे.