Railway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

तिसऱ्या रेल्वेलाईनमुळे नांदगावची 3 भागात विभागणी;नागरिकांचे आंदोलन

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : मध्यरेल्वेच्या भुसावळ ते मनमाड या तिसऱ्या लाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे. नांदगाव शहरात या तिसऱ्या लाईनचा सर्व्हे चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे मनमाड शहराची तीन भागांत विभागणी झाली आहे. याचा फटका नागरिकांना बसू लागला असून, शहरातील दैनंदिन दळणवळण विस्कळित झाले आहे. याविरोधात नागरिकांनी पालिका कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.

मध्यरेल्वेचे १ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या भुसावळ ते मनमाड या महत्वाकांक्षी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यातही नांदगाव ते मनमाड २५.९ किलोमीटरचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. भुसावळकडून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या तिसऱ्या लाइनमुळे नांदगाव शहराची दोन सरळ भौगोलिक क्षेत्रात वाटणी झाल्याने दैनंदिन दळणवळण विस्कळित बनले आहे. नगररचनेच्या विकास आराखड्यात दिसणारे नागरी वसाहतीचे दोन भागात विभाजित झाल्याने एका बाजूला मुख्य भागात मुख्य बाजारपेठ, दवाखाना, बँका, शाळा, अशा सुविधा तर दुसऱ्या बाजूला नवे प्रशासकीय संकुल, न्यायालय, बाजार समिती, ग्रामीण रुग्णालय होते. दोन भागात विभाजन होऊनही हे भाग रेल्वे फाटकाच्या माध्यामातून संपर्कात राहत असे. पुढे यासाठी सबवे करण्यात आला. मात्र, आता या भागात आता सबवे नंतर तिसरा ट्रॅक आल्याने या भागातील नागरी वस्ती विभागली गेली आहे.

या तिसऱ्या ट्रॅकचे सर्वेक्षण करताना स्थानिक पातळीवर उद्भवणाऱ्या समस्यांचा विचार करण्यात आला नाही. यामुळे या नवीन ट्रॅकमुळे शहरातल्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. सध्या लेंडी नदीपात्रात तिसऱ्या मार्गासाठी अतिरिक्त पुलाच्या कामासाठी भरावाचे काम सुरु असल्याने लक्ष्मी थिएटर्सकडची पूर्वपरंपरागत वहिवाट बंद पडणार आहे. यातच बाजार समितीतत येणाऱ्या वाहनांना दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा घालून उड्डाणपूल मार्गे शहरात यावे लागणार आहे. यातच सबवेचा दुसरा मार्ग खुला झालेला नाही. यामुळे नांदगावच्या लोकांना एका भागातून पलिकडच्या भागात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागणार आहे. यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी सोमवारी (ता.२४) पालिका कार्यालयासमोर आंदोलनास सुरवात केली. या प्रश्नी तोडगा न निघाल्याने आंदोलन मंगळवारीही सुरूच होते.

सध्या नांदगाव ते मनमाड २५.९ किलोमीटरचे काम तिसऱ्या लोहमार्गाच्या अस्तरीकरणाचे काम प्रगतीत आहे. या मार्गात ३०४ लहान, तर २२ मोठे पूल आहे. तब्बल १ हजार ३५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे.