NMC Clean Godavari Bonds Tendernama
उत्तर महाराष्ट्र

NMC Clean Godavari Bonds: नाशिक महापालिकेला तासाभरात मिळाले तब्बल 200 कोटी

Nashik: म्युनिसिपल बॉण्ड इश्‍यू करणारी नाशिक महानगरपालिका राज्यातील तिसरी महानगरपालिका ठरली

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (NMC Clean Godavari Bonds 2030): म्युनिसिपल बॉण्ड इश्‍यू करणारी नाशिक महानगरपालिका राज्यातील तिसरी महानगरपालिका ठरली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील विकासकामांसाठी स्वहिश्शाचा निधी उभा करण्यासाठी नाशिक महापालिकेच्यावतीने दोनशे कोटी रुपयांचे ‘एनएमसी क्लीन गोदावरी बॉण्ड्स’चे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये National Stock Exchange (NSE) मंगळवारी (ता. २) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते लिस्टिंग करण्यात आले.

लिस्टिंग होताच अर्ध्यातासामध्ये महापालिकेचे सर्व २० हजार रोखे विकले गेले. या निधीतून महापालिकेची विविध विकास कामे मार्गी लागणार आहेत.

मुंबईत नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे ‘एनएमसी क्लीन गोदावरी बॉण्ड्स’ लिस्टींग कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, नगर विकास विभागाचे अपर मुख्यसचिव डॉ. डी. एच. गोविंदराज, नविन सोना, ए. के. कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुलकुमार मित्तल, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनिषा खत्री आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

सिंहस्थ कुंभमेळानिमित्ताने नाशिक महापालिका क्षेत्रात हजारो कोटींची कामे मंजूर झाली आहेत. या कामांसाठी राज्य सरकार निधी देणार असले, तरी त्यात महापालिकेला २० टक्के स्वहिस्सा द्यावा लागणार आहे. कामांची संख्या मोठी असल्यामुळे एवढा मोठा निधी महापालिकेकडे उपलब्ध नसल्याने महापालिकेने राज्य सरकारच्या मान्यतेने भांडवल बाजारातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार 'एनएमसी क्लीन गोदावरी बॉण्ड्स'चे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी करण्यात आली. या बॉण्डमुळे नाशिक महापालिकेला केंद्र शासनाकडून २६ कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदान तसेच अर्बन चॅलेंज फंडाच्या माध्यमातून बिनव्याज कर्ज स्वरुपात निधी उपलब्ध होणार आहे.

एनएसईमध्ये २०० कोटींचे २० हजार रोखे नोंदणी केल्यानंतर ते रोखे खरेदीसाठी एक तासांचा वेळ देण्यात आला होता. मात्र, अवघ्या अर्ध्या तासामध्ये या सर्व रोख्यांची विक्री झाली. या रोख्यांपैकी ९७.५ टक्के रोखे एकट्या नॅशनल बँक फॉर फायनान्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲंड डेव्हलपमेंटने खरेदी केले. उर्वरित रोखे गो डिजीटल जनरल इन्शुरन्स लिमिटेडने खरेदी केले.

महापालिका या निधीचा उपयोग रामझुला पादचारी पूल, काळाराम मंदिर परिसरात वेंडिंग प्लाझा, मूलभूत विकास कामे, कपालेश्वर मंदिराजवळ सोयी सुविधा तयार करणे व पंचवटी, सातपूर व पश्चिम विभागात मलनि:सारण प्रकल्पांसाठी स्वहिस्सा भरण्यासाठी करणार आहे.