Nashik ZP
Nashik ZP Tendernama
उत्तर महाराष्ट्र

ZP: बांधकामचे 12 स्थापत्य सहायक पाणीपुरवठाचे कनिष्ठ अभियंता कसे?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) बांधकाम विभागातील १२ स्थापत्य सहायकांना ग्रामीण पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नती देण्याचा प्रताप जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या पदोन्नतीचा प्रस्ताव बांधकाम विभाग एकच्या कार्यकारी अभियंत्यांनी रोखून धरला होता. विशेष म्हणजे त्यांच्या बदलीनंतर महिन्याच्या आत या पदोन्नती मार्गी लागल्या आहेत.

एका विभागातून दुसऱ्या विभागात पदोन्नती देण्याचा कोणताही शासननिर्णय नसताना या १२ जणांना कशाच्या आधारावर पदोन्नत्या दिल्या, असा प्रश्‍न विचारला जात आहे. केवळ तर्काच्या आधारे बांधकाम व सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या या पदोन्नत्या वादात सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे २०२४ पर्यंत जलजीवन मिशनची १४४३ कोटी रुपयांची कामे आहेत. त्यानंतरही या सर्व १२८२ योजनांची देखभाल, दुरुस्तीसाठी मनुष्यबळाची गरज असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे शाखा अभियंता व उपअभियंता यांची पदे रिक्त आहेत. त्याताच राज्याच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने मिशन जलजीवनमुळे प्रत्येक जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढल्यामुळे प्रत्येक तालुक्यात पंचायत समितीस्तरावर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यालय निर्मिती केली आहे.

या कार्यालयात शाखा अभियंता व उपअभियंत्यांच्या नियुक्त्याही जाहीर केल्या आहेत. मात्र, सध्या या विभागात केवळ ९ शाखा अभियंते व उपअभियंते असल्याने त्यांच्याकडेच १५ तालुक्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात १२८२ योजनांची कामे सुरू आहेत. या योजनांचे संनियंत्रण करण्यासाठीही पुरेशा शाखा अभियंत्यांची गरज आहे. यामुळे जिल्हा परिषदेने मागील महिन्यात अनुकंपा तत्वावर केलेल्या नियुक्त्यांमध्ये पाच स्थापत्य सहायकांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, अनेक महिन्यांपासून बांधकाम व जलसंधारण विभागातील स्थापत्य सहायकांना ग्रामीण पाणीपुरवठा विभागात पदोन्नती देण्याचा घाट सामान्य प्रशासन व बांधकाम विभागाकडून घातला गेला. त्यावेळी काही विभागप्रमुखांनी एका संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या संवर्गात पदोन्नती देणे नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे हा प्रस्ताव बांधकाम विभाग एकने काही महिने रोखून धरला होता. मात्र, बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याची फेब्रुवारीत बदली झाल्यानंतर नव्याने आलेल्या कार्यकारी अभियंत्यांनी या १२ स्थापत्य सहायकांना पदोन्नती दिल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांचा संवर्ग एकच असल्याने त्यांना इतर विभागांमध्ये पदोन्नती देता येते. हे पदोन्नती दिलेले स्थापत्य सहायक आता पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंते झाले असून त्यांचा राज्यस्तरीय संवर्ग पाणीपुरवठा विभागात असून तेथील ज्येष्ठता यादीत त्यांचा समावेश होणार असल्याचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी ‘टेंडरनामा’ प्रतिनिधीस सांगितले.

दरम्यान जिल्हा परिषदेस सामान्य प्रशासन विभागात कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, वित्त विभागात कनिष्ठ लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी, आरोग्य विभागात आरोग्य सहायक आदी संवर्ग आहेत. या सर्वांची नियुक्ती जिल्हा परिषद पातळीवर होत असते. तरीही आरोग्य सहायकांना सामान्य प्रशासन विभागात अथवा सामान्य प्रशासनमधील कनिष्ठ सहायकांना लेखा व वित्त विभागात पदोन्नती दिली जात नाही, तर बांधकाम विभागातील स्थापत्य सहायकांना पाणी पुरवठा विभागात पदोन्नती कोणत्या आधारावर दिली गेली, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. यामुळे या पदोन्नती वादात सापडण्याची शक्यता आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल सप्टेंबरच्या अखेरीस रुजू झाल्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले विभागप्रमुख त्यांची दिशाभूल करीत असल्याचे यापूर्वीही वारंवार दिसून आले आहे.

यामुळे प्रशासनाशी संबंधित प्रत्येक फाईल सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून व आर्थिक विषयक फायली मुख्या लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात आल्या पाहिजेत, असा दंडक त्यांनी घालून दिला आहे. मात्र, यानंतरही ही पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अनभिज्ञ असल्याची चर्चा आहे.