Nashik ZP Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik ZP: नोकरशाहीच्या आग्रहाला आचारसंहितेचा चाप; नवीन इमारतीचे उद्घाटन लोकप्रतिनिधींच्या काळातच

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) नवीन इमारतीच्या तीन मजल्यांचे काम अपूर्ण असतानाही नोकरशाहीच्या आग्रहामुळे उद्घाटनाचा घाट नगरपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उधळला गेला आहे. यामुळे आता निवडणुकीनंतरच लोकप्रतिनिधीच्या काळातच या नवीन संपूर्ण इमारतीचे उद्घाटन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगरपालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता ही नगरपालिका क्षेत्रापुरती मर्यादित असली तरी मतदारांवर प्रभाव पडेल, असे कार्यक्रम इतर ठिकाणी घेता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याने या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त टळला आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम सध्या सातपूर मार्गावर सुरू आहे. जवळपास 82 कोटींच्या या इमारतीच्या सहा मजल्यांपैकी तीन मजल्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित तीन मजल्यांचे काम 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

दरम्यान जिल्हा परिषद कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित होईल, असे गृहित धरून सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणला नाशिक जिल्हा परिषदेच्या इमारतीचा काही भाग दिला आहे. मात्र, ती जागा कमी पडत आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे काही विभाग सातपूर मार्गावरील नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत हलवून ती जागा सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणला हस्तांतरित करण्याचे नियोजन सुरू आहे.

यासाठी नवीन इमारतीच्या सहा मजल्यांपैकी काम पूर्ण झालेल्या तीन मजल्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ७ नोव्हेंबरला करण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू होते. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेले होते. तसेच या इमारतीच्या सहा मजल्यांपैकी तीन मजल्यांपुरता काम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246नगरपालिका व 42 नगरपंचायत यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. याचवेळी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने आचार संहितेचे कार्यक्षेत्र स्पष्ट करताना सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू राहील व पोटनिवडणुकीची आचारसंहिता संबंधित प्रभाग किंवा संबंधित निवडणूक विभाग किंवा संबंधित निर्वाचक गण यांच्यापुरतीच लागू असेल, असे स्पष्ट केले आहे.

त्याचवेळी आचारसंहिता निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रापुरती लागू होणार असली तरी त्या बाहेरील आजूबाजूच्या क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमामुळे मतदारांवर प्रभाव पडून त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकेल, असे कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. त्यासाठी त्यांनी उदाहरण देताना म्हटले आहे की,  जिल्हा परिषदेची निवडणूक असेल तर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जरी ते मुख्यालय ग्रामीण क्षेत्रात समाविष्ट होत नसले तरीही तेथे निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर प्रभाव पडेल, असा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.

तसेच महानगरपालिका अथवा नगर परिषद, गरपंचायत क्षेत्रात निवडणूक असताना त्याला लगतच्या ग्रामीण क्षेत्रात असा कार्यक्रम किंवा अशी कृती करता येणार नाही, ज्यामुळे महानगरपालिका, नगरपरिषद,नगरपंचायतीच्या निवडणूका अथवा मतदारावर परिणाम होईल. त्याशिवाय, संपूर्ण राज्यामध्ये आचारसंहितेच्या कालावधीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांवर प्रभाव पडेल, असा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.

या सूचनांचा विचार करता आता नगर पालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असली, तरी तेथील मतदारांवर प्रभाव पडेल असेल कार्यक्रम इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी घेता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद नवीन इमारतींचे उद्घाटन लांबणीवर पडणार हे स्पष्ट झाले आहे.

भूमिपूजनाशिवाय होणार कामे सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सात हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता क्षेत्राबाबतच्या सूचनांचा विचार करता सिंहस्थाच्या सात हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन करता येणार नाही. यातील जवळपास सर्वच कामांना कार्यारंभ आदेश दिलेले असल्याने ती कामे सुरू करण्यात अडचण येणार नसली तरी त्या कामांचा गाजावाजा करता येणार नाही.

प्रशासकांचा स्वप्नभंग

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे उदघाटन आपल्या कारकीर्दीत व्हावे, यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी इमारतीच्या कामाचा वेगाने पाठपुरावा केला. त्यांनी ऑगस्टमध्ये उद्घाटन होईल, या पद्धतीने नियोजन केले होते. त्यासाठी त्यांनी वरच्या तीन मजल्यांचे काम सुरू असताना खालील तीन मजल्यांचे रंगकाम केले. मात्र, त्या आधीच त्यांची बदली झाल्याने त्यांचे स्वप्न अपुरे राहिले.

जिल्हा परिषदेच्या सध्याच्या इमारतीत सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणला आणखी जागा हवी आहे, म्हणून विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही या इमारतीच्या उद्घाटन करण्यास सुरक्षेच्या कारणामुळे अडथळा ठरलेल्या वरच्या तीन मजल्यांचे काम युद्धपातळीवर व्हावे, यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार त्यांनी काम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी महापालिकेकडे प्रयत्न सुरू केले.

तो दाखला मिळणार असल्याचे स्पष्ट होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेतली असतानाच नगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे उद्घाटन कार्यक्रम न करताच जिल्हा परिषदेची काही कार्यालये नवीन इमारतीत स्थलांतरित होतील, असे दिसत आहे.